सत्तरीतील पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात; ‘घाेडेमोडणी’ ‘चोरोत्सव’ खास आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 12:23 PM2024-03-24T12:23:51+5:302024-03-24T12:25:17+5:30
राज्यातील पारंपरिक शिमगोत्सवाला सुरवात झाली आहे. दक्षिण गोव्यातील शिमगाेत्सव हा अगोदर संपताे नंतर उत्तर गाेव्यातील शिमगोत्सवाला सुरुवात होते.
नारायण गावस, पणजी: राज्यातील पारंपरिक शिमगोत्सवाला सुरवात झाली आहे. दक्षिण गोव्यातील शिमगाेत्सव हा अगोदर संपताे नंतर उत्तर गाेव्यातील शिमगोत्सवाला सुरुवात होते. उत्तर गोव्यातील सत्तरी, डिचाेली, पेडणेचा शिमगाे हा खूप प्रसिद्ध आहे. सत्तरीत अजूनही पारंपरिक पद्धतीने शिमग्याचे वेगवेगळे खेळ पहायला मिळतात. कालपासून गावातील मांडावर शिमग्याला सुरुवात झाली आहे. काही गावात रात्रीची पूनवेची होळी घातली जाते तर काही गावात उद्या हाेळी घातली जाणार आहे.
सत्तरीत अनेक गावातील शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शिमगा साजरा केला जात होता त्याच पद्धतीने अजून आताची पिढी साजरी करत आहे. काळ बदलत गेला पण लाेकांनी आपली पारंपरिक परंपरा तशीच ठेवली आहे. गावागावातील मंदिराच्या प्राणांगणात विविध खेळ खेळले जातात. तसेच प्रत्येकांच्या घराघरात हे खेळ खेळले जातात.
सत्तरीत शिमगोत्सवात खेळले जाणारे खेळ
सत्तरी शिमगोत्सवात पहिल्याच दिवसापासून तालगडी खेळला जातो. मंदिराच्या प्राणांगणात तालगडी हे पारंपरिक नृत्य खेळले जाते. नंतर होळी घातली जाते रानात जाऊन आंब्याची किवा अन्य झाडाची होळी आणून ती वाजत गाजत हाेणक्यात घातली जाते नंतर बाजूला अग्नी लागू होळी दहन केली जाते. नंतर गावात करवली उत्सव होत असतो. दाेन लहान मुलांना करवली केली जाते. करवली म्हणजे पूर्वीची सती प्रथा आहे. त्याच्या नंतर सत्तरीत घोडेमोडणी खूप प्रसिद्ध आहे. प्रत्येक गावागावात घोडेमाेडणीचे खेळ खेळले जातात. नंतर चाेराेत्सव हा एका प्रसिद्ध खेळ आहे ताे सत्तरीतील अनेक गावात शिमगाेत्सवात साजरा केला जातो. त्यानंतर रोमाट, देवाची पालखी मिरवणूक आणि शेवटच्या दिवशी न्हावण अशी सात दिवसांची परंपरा आहे.
सत्तरीतील काही गावातील प्रसिद्ध खेळ
सत्तरीत बहुतांश गावात काही प्रसिद्ध खेळ आहेत ते फक़्त गोव्यापुरतेच मर्यादित नाही तर इतर राज्यातील अनेक लोक ते खास पहायला येतात. यात ठाणे सत्तरी येथील दाेन वर्षांनी एकदा होणारी घोडेमाेडणी प्रसिद्ध आहे. ही सात गावांची म्हणजे सात भावांची घाेडेमोडणी म्हणून प्रसिद्ध आहे. ठाणे येथील मंडळगिराे काेळीगिराे या देवाच्या प्राणांगणात ही साजरी केली जाते. यंदा ही घोडेमोडणी २९ राेजी आली आहे. तसेच झर्मे आणि करंझाेळ चाेरोत्सव खूप प्रसिद्ध आहे. झर्मेचा चाेराेत्स उद्या सोमवारी सायं. देवळाच्या प्राणांगणात साजरा होणार आहे तर करंझाेळचा चाेराेत्सव ३० मार्च राेजी साजरा हाेणार आहे. तसेच कोपार्डे ब्राह्मणी महामाया देवस्थानचा न्हावणोत्सव विषेश आकर्षण आहे. हा न्हावणोत्सव यंदा २९ मार्च रोजी हाेणार आहे. तसेच गुळ्ळे गावातील घोडेमाेडणी आणि भरणूल हा पारंपरिक खेळही खूप प्रसिद्ध आहे भरणूल ३० रोजी शनिवारी रात्री देवळाच्या प्राणंगणात हाेणार आहे. त्याचप्रमाणे पर्ये गावचे राेमटामेळ हाही सत्तरीतील प्रसिद्ध राेमटामेळ म्हणून पाहिला जातो. अशा पद्धतीने सत्तरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे.