पणजी: पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये गोवा विधानसभा निवडणुकीचाही (Goa Election 2022) समावेश असून, राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशानंतर राजकीय समीकरण बदलण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाला सोडचिठ्ठी देत विजय सरदेसाई आणि विनोद पालयेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजप आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, दोन नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
गोव्याचे आताचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हटवून त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री केली जाण्याची शक्यता दिल्लीतल्या वर्तुळात वर्तवली जात आहे. प्रमोद सावंत यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्याच बैठकीत गोव्याचा मुख्यमंत्री बदलला जाण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी विधानसभेत थोड्या जरी जागांचा फटका बसला तर भाजपच्या हातातून गोव्यासारखे महत्वाचे राज्य जाऊ शकते. यातच गोव्यात तृणमूल काँग्रेस सक्रीय झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘ही’ दोन नावे आघाडीवर?
प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदावरुन बाजूला केल्यास त्यांच्या जागी कोण हेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. विश्वजीत राणे आणि चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांची नावे चर्चेत असल्याचे समजते. विश्वजीत प्रतापसिंह राणे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंचे सुपूत्र असून, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. तर, चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे सध्याचे गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. बाबू कवळेकरही मूळचे भाजपवासी नसून, ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते आणि त्यांनी भाजपच्याच उमेदवाराचा पराभव केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीवरही यावेळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच उमेदवारीबाबत प्राथमिक चर्चा तसेच पक्षातील नाराजी याबाबत शहा यांनी जाणून घेतले. अलीकडेच शहा यांनी गोवा दौरा केला होता. कार्यकर्त्यांनाही संबोधित केले होते. प्रमोद सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश सरचिटणीस सतीश धोंड हेही दिल्लीत दाखल झाले होते.