भाजपचे राज्यभर महासंपर्क अभियान: प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 10:17 AM2023-06-01T10:17:22+5:302023-06-01T10:18:12+5:30
जुने नेते, कार्यकर्त्यांशी पक्ष साधणार संवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळ पूर्तीनिमित आज, गुरुवारपासून गोवा भाजपकडून महासंपर्क अभियान राबविले जाईल. याअंतर्गत पक्षाच्या जुने नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपकडून देशभरात महासंपर्क अभियान राबवले जाणार आहे. ३० जूनपर्यंत हे अभियान सुरू राहिल. केंद्र तसेच राज्यातील भाजप सरकारचे उपक्रम, यशस्वीपणे राबविलेले प्रकल्प याची माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
'महासंपर्क अभियानांतर्गत १ ते ५ जून यादरम्यान राज्यातील मंत्री, पक्षाचे नेते प्रत्येक मतदारसंघाला भेट देऊन विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून चर्चा करतील. त्याला 'संपर्क से समर्थन' असे नाव दिले आहे. सध्या पक्षाच्या कामापासून दूर असलेल्या जुने नेते, कार्यकर्त्यांशी पक्षाचे नेते संपर्क साधून चर्चा करतील,' असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठा विकास साधला आहे. आर्थिक सुबत्ता साधली आहे. अनेक जनल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या निधींतर्गत उभारलेल्या प्रकल्पांनाही भेट देतील. शिवाय १३ ते १७ जून या काळात संयुक्त मोर्चा संमेलन, १८ ते २२ जून यादरम्यान भाजप मंडळ केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी संमेलन घेतील. २१ जून रोजी योगा दिन, २३ जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस पाळला जाईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. २५ जून रोजी प्रत्येक बुथवर कार्यकर्ते मन की बात पाहतील' असे तानावडे यांनी सांगितले.
यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, प्रेमानंद म्हाम्ब्रे, रुपेश कामत, सर्वानंद भगत हजर होते.