गोव्यातील कदंब पठाराला सोन्याचे मोल, बिल्डर-राजकारण्यांचा डोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 12:47 PM2018-01-15T12:47:16+5:302018-01-15T12:49:44+5:30
राजधानी पणजीच्या कदंब बस स्थानकापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कदंब पठाराला आता सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे
पणजी : राजधानी पणजीच्या कदंब बस स्थानकापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कदंब पठाराला आता सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे. पणजीचा विस्तार या पठारावर होऊ लागला असून येथील जमिनीचा भाव खूप वधारला आहे. परिणामी अनेक मोठे बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी यांचा डोळा या पठाराकडे वळला आहे. खूप वेगाने हा पठार व्यवसायिकदृष्ट्या विकसित होत आहे.
पूर्वी राज्यातील सगळेच मोठे बांधकाम व्यावसायिक हे ताळगाव व करंजाळेच्या भागातच लक्ष केंद्रीत करून असायचे. अजुनही ताळगाव, करंजाळे, दोनापावल या भागाला महत्त्व आहेच. तिथे शेकडो फ्लॅट्सचे बांधकाम सुरू आहे. तथापि, कदंब पठार हा नवा हॉट केक आता बांधकाम व्यावसायिकांना व राजकारण्यांनाही सापडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या पठारावरून जात असलेला मार्ग चार पदरी व सहा पदरी केला. यामुळेही बांधकाम व्यावसायिकांची सोय झाली.
पणजीत लोकांना राहण्यासाठी आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे शहराचा विस्तार कदंब पठारावर होताना दिसतो. अजूनही या पठारावर नळाद्वारे पुरेसे पाणी येत नाही. तथापि, बांधकाम खात्याने भविष्यात येथे पाणी पुरविण्यासाठी नियोजन चालविले आहे. या पठारावर हजारो नव्या फ्लॅट्सचे बाधकाम सुरू आहे. दहा एमएलडी पाणी रोज या पठाराला लागेल, असे बांधकाम खात्याचे म्हणणे आहे. तेवढे पाणी सध्या तरी देता येणार नाही. अनेक मोठय़ा व्यवसायिकांनी विहिरी खोदल्या आहेत.
कदंब पठारावर मर्सिडीजा शोरूम आहे. साईबाबा मंदिर, हेल्थवे हॉस्पिटल, पंचतारांकित हॉटेल्स, अनेक बंगले तसेच किमान दहा हजार फ्लॅट गेल्या पाच वर्षात उभे राहिले आहेत. करंजाळे, ताळगावच्या काही भागांमध्ये जमिनीला जेवढे मोल आले आहे, तेवढाच भाव सध्या कदंब पठारावरील जमिनीचा आहे. कदंब पठारावर लोकवस्ती वाढत असून अनेक मोठे व्यवसायिक तिथे भूखंड विकसित करू लागले आहेत. तसेच यापूर्वी ज्यांनी ऑर्चड व अन्य जमिनी घेतल्या आहेत, त्यांना त्या जमिनींचे बिगरशेतजमिनीत रुपांतरण करून दिलेले हवे आहे. यामुळे सत्तेशीनिगडीत राजकारण्यांनी येथे लक्ष वळविले आहे. ग्रेटर पणजी ही नवी पीडीए स्थापन केली गेली असून या नव्या पीडीएमध्ये कदंब पठाराचा समावेश केला गेला आहे. कदंब पठार म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे समीकरण होऊ लागले आहे. तिथे टेकड्या कापणो, भराव टाकून जमीन सपाट करणे असे धंदे सुरू आहेत. कदंब पठारावरील जमीन बुजविण्याचा व बेकायदा उत्खनन करण्याचा एक प्रकार रविवारी उघड झाला व नगर नियोजन खात्याने आणि पोलिसांनी मिळून कारवाई करत गुन्हाही नोंद केला आहे.