अलोट गर्दीत कार्निव्हलची धूम; नृत्याविष्कारासह जपली राज्याची संस्कृती
By पंकज शेट्ये | Published: February 12, 2024 10:52 PM2024-02-12T22:52:56+5:302024-02-12T22:53:20+5:30
विविध गटांनी सादर केलेल्या चित्ररथ, नृत्य, संगीताने नागरिक भारावून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश किंग मोमोने दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी वास्कोत कार्निव्हल मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. स्वतंत्र पथ मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली. विविध गटांनी सादर केलेल्या चित्ररथ, नृत्य, संगीताने नागरिक भारावून गेले.
सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजता किंग आणि क्वीन मोमोच्या चित्ररथाने कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी बावटा दाखवला व मिरवणूक सुरु झाली. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर आणि वास्को कार्निव्हल समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
किंग आणि क्वीन मोमोच्या चित्ररथानंतर देशभक्ती जागवणारा चित्ररथ आकर्षक ठरला. भारतीय नौदलाच्या गोवा विभागाने बॅण्ड पथक, संचलन पथकासह आयएनएस मुरगाव या लढाऊ जहाजाची प्रतिकृती दर्शवणारा चित्ररथ चित्तवेधक होता. एकूण ५७ पथकांनी भाग घेतला होता. त्यात कुटुंब गटात ९, क्लावन ॲण्ड जोकर मध्ये १४, पारंपरिक गटात ८, फंक जंक मध्ये ९, इन्स्टिट्युशन गटात १५ आणि स्पॉन्सर गटात २ पथकांनी भाग घेतला. उत्तम संगीत - नृत्याबरोबरच कार्निव्हल मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांना गोव्याची परंपरा - कला, संस्कृती दर्शवणारे चित्ररथ पहायला मिळाले.