लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : ११ हजार १४० कोटी रुपयांची जीएसटी थकबाकीची नोटीस बजावलेल्या डेल्टाकॉर्प कॅसिनो कंपनीसह इतर कॅसिनो कंपन्यांनी सरकारच्या कर प्रणालीवरच थेट आक्षेप घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता या कंपन्यांनी जीएसटी संचालकाच्या आदेशाला उच्च न्यायालात आव्हान दिले.
न्यायालयाने जीएसटी संचालकाने बजावलेल्या नोटीसीला अंतरीम स्थगिती दिलेली नाही. परंतु न्यायालयालाच्या परवानगीशिवाय जीएसटी संचालनालयाकडून याचिकादारांवर नोटीसंबंधी पुढील कारवाई केली जाणार नसल्याचेही जीएसटी संचालनालयाच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले.
कॅसिनोतील एकूण बेटिंगच्या फेसव्हॅल्यूवर २८ टक्के कर आकारणीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कॅसिनो मालकांनी आक्षेप घेतला आहे. जीएसटी संचालकाच्या कर आकारणी संबंधीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. कर आकारणी ही कॅसिनोतील निव्वळ नफ्यावर व्हावी, असा कॅसिनो कंपन्यांचा आग्रह आहे. जीएसटी हा केंद्र आणि राज्य सरकारला समप्रमाणात फेडला जात आहे. कंपन्यांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केल्यानंतर ती याचिका दाखल करून घेत फेब्रुवारी २०२३ मध्ये सुनावणी ठेवण्यात आली आहे.
कॅसिनो मालकांच्या बाजूने मुंबईचे ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी युक्तिवाद केला. याचिका दाखल करून घेऊन खंडपीठाने सरकारला यासंदर्भात स्पष्टीकरणासह प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. तसेच जीएसटी संदर्भातील आकडेवारीही सादर करण्यास सांगितली आहे. मात्र, कॅसिनो मालकांना कर आकारणी संदर्भात दिलासा न्यायालयाने दिलेला नाही.
सरकारचे केंद्राला साकडे
कॅसिनोंसाठीच्या जीएसटी प्रणालीचा फेरविचार करावा या मागणीसाठी गोवा सरकारनेही केंद्राकडे प्रयत्न चालविले आहेत. त्याची कबुलीही सरकारमधील काही मंत्र्यांनी दिली आहे. १५ दिवसांपूर्वी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत मंत्री माविन गुदिन्हो यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र या प्रयत्नांना अजून यश आलेले नाही आहेत.
डेल्टा'ला धक्के
डेल्टा कॉर्पला जीएसटी संचालकाने ११ हजार १४९ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस पाठविल्यावर डेल्टा कॉर्पचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. अजूनही शेअर मार्केटमध्ये कंपनीला धक्के बसतच आहेत. डेल्टा कॉर्पचे गोव्यात तीन कॅसिनो आहेत. यामध्ये डेल्टिन रॉयल, डेल्टिन जेएक्यूके आणि डेल्टिन कॅरावेला यांचा समावेश आहे.