पणजी - मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे बाहेर काढा किंवा ती अन्यत्र हलवा अशी मागणी पणजीतून होऊ लागल्याने व आमदार बाबूश मोन्सेरात तसेच पणजी महापालिकेनेही या मागणीला बळ दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार दबावाखाली येऊ लागले आहे. कॅसिनो मोपा गावात हलविले जातील अशा प्रकारची भूमिका सरकारने जाहीर केल्यानंतर मोपामधूनही विरोध सुरू झाला आहे. तसे स्पष्ट संकेत सोशल मीडियावर मिळू लागले आहेत.
मोन्सेरात यांचा मनापासून कॅसिनोंना विरोध नसेलच पण त्यांनी आपण शंभर दिवसांत आपण कॅसिनो मांडवीमधून बाहेर काढू अशी ग्वाही पणजीतील पोटनिवडणुकीवेळी लोकांना दिली होती. त्यामुळे त्यांना कॅसिनोविरुद्ध चळवळ करणे भाग पडले आहे. मात्र पणजी महापालिका जेव्हा फुटपाथवरील अतिक्रमण दूर करण्याची कारवाई पणजीत करत होती, त्यावेळी आमदार मोन्सेरात यांनी तिथे उपस्थित राहण्याची गरजच नव्हती अशा प्रकारची प्रतिक्रिया अनेक मंत्र्यांमधून व्यक्त होत आहे. महापालिका स्वत: चे काम करणार असती, तिथे आमदाराची काय गरज असते असाही प्रश्न विचारला जात आहे. मोन्सेरात यांनी कॅसिनोप्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याने व लोकांमधील असंतोषाला ते चिथावणी देऊ लागल्याने भाजपाच्या कोअर टीममध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. मोन्सेरात यांना रोखावे कसे याविषयी भाजपामध्ये व सरकारमध्येही खल सुरू झाला आहे. कॅसिनो व्यवसायिकांशी वाईटपणा घेण्याची सरकारची तयारी नाही. मुख्यमंत्री सावंत यांचा कॅसिनोंशी संबंध नाही, ते कधी कॅसिनोंवर पोहचलेही नाही पण सत्ताधाऱ्यांमधील काहीजणांचे कॅसिनोंशी असलेले साटेलोटे गेली काही वर्षे लपून राहिलेले नाहीत. काही आमदार किंवा मंत्रीही ठराविक काळातच कॅसिनोंविरुद्ध आवाज उठवतात व मग अत्यंत शांत राहतात हेही पणजीने अनुभवले आहे. भाजपाने विरोधात असताना कॅसिनोंविरुद्ध मशाल मोर्चाही काढला होता.
मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिल्यानंतर विमानतळाशी निगडीत गेमिंग झोनमध्ये कॅसिनो हलवूया अशी सरकारची भूमिका आहे. तसे विधान मुख्यमंत्री सावंत यांनीही केले आहे. मात्र पेडण्यात कॅसिनो जुगार नकोच, आम्ही पेडण्यात कॅसिनो हलविण्यास विरोध करू, अशी भूमिका पेडण्यातील सामाजिक कार्यकर्ते घेऊ लागले आहेत. मोपा येथे विमानतळ व गेमिंग झोन नेमका कधी उभा होईल याचीही हमी कोणी देत नाही. तोर्पयत पुढील चार-पाच वर्षे सरकार जर मांडवीतच कॅसिनो ठेवणार असेल तर असंतोष वाढत जाईल. विशेषत: रात्रीच्यावेळी पणजीत सर्वत्र दुचाक्या व चारचाकी वाहने पार्क केली जातात. कॅसिनोंवरील हे ग्राहक लोकांच्या दारांसमोर वाहने ठेवतात. लोकांना घरातून बाहेर येता येत नाही व अनेक हॉटेल-रेस्टॉरंटवाल्यांनाही ग्राहकांना मुकावे लागते. कारण त्यांच्या रेस्टॉरंट परिसरात ग्राहकांना वाहन पार्किंगसाठी जागाच मिळत नाही.
मुख्यमंत्र्यांचा सल्ला
दरम्यान, गेल्याच आठवड्यात आमदार मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली व कॅसिनोप्रश्नी चर्चा केली. आपण मांडवीतून शंभर दिवसांत कॅसिनो हटविण्याची ग्वाही दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही पाऊले उचलावीत असे मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. शंभर दिवसांत कॅसिनोंसारखा उद्योग बाजूला करता येत नाही याची कल्पना मुख्यमंत्र्यांनी बाबूशला दिली व सरकार योग्य ती पाऊले पुढील काळात उचलील अशीही कल्पना दिली. तुम्ही जर लोकांना आश्वासन दिलेले असेल तर तुम्ही माझ्याशी कॅसिनोप्रश्नी चर्चा केली आहे व सरकार विचार करत आहे असे तुम्ही पणजीतील मतदारांना सांगा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी बाबूशना दिला होता. मात्र बाबूशने तो सल्ला मान्य केला नाही.