लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : जैका प्रकल्पातील ‘लुईस बर्जर’ कंपनीच्या लाचखोरीच्या धर्तीवर आणखी एक घोटाळा अमेरिकन न्यायविभागापुढे उघड झाला आहे. त्यात गोव्यात कंत्राट मिळविण्यासाठी भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला ‘सीडीएम स्मिथ’ या अमेरिकन कंपनीने १६.७ लाख रुपये लाच दिल्याची कबुली दिली आहे. हे प्रकरणही पाणी पुरवठ्यासंबंधीच असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.लुईस बर्जर लाचखोरी काँग्रेस सरकारच्या काळात घडली होती, तर ‘सीडीएम स्मिथ’ची लाचखोरी २०११ ते २०१५ या काळात झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. गोव्यात पाणी प्रकल्पासाठी कंत्राट घेण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली. त्यातून कंपनीने कंत्राटही मिळविले. गोव्यातील प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांना २५ हजार अमेरिकन डॉलर लाच देण्यात आल्याचे कंपनीच्या अमेरिकन न्यायालयातील निवेदनातून स्पष्ट होत आहे. भारतीय चलनात त्याची किंमत १६.१ लाख रुपये आहे. त्यात लाचेची रक्कम ‘कंत्राटाच्या रकमेच्या २ टक्क्यांपासून ४ टक्के’ असे म्हटले आहे. तसेच ‘वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी’ असा लाच घेणाऱ्यांचा उल्लेख आहे.भारतातील अनेक प्रकल्पांची कंत्राटे लाच देऊन मिळविल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. प्रकल्पातून मिळालेल्या नफ्यातून २५ कोटी रुपये रक्कम दंडाच्या स्वरुपात अमेरिकेच्या तिजोरीत भरण्याची तयारी दर्शविली आहे. त्या कंपनीने संबंधित प्रकल्पही पूर्ण केला आहे. कंपनी १ आॅक्टोबर २०१७ रोजी कंपनी दंडाचा पहिला हप्ता भरणार आहे. हा प्रकल्प कोणता, कोणत्या अधिकाऱ्याने कोणाकडून किती लाच घेतली? त्याचबरोबर लुईस बर्जर प्रकरणात जसे गुन्हे नोंदविण्यात आले होते, तसे आताही जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले जाणार काय, असे प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले आहेत.
गोव्यात ‘लुईस बर्जर’नंतर ‘सीडीएम स्मिथ’ लाचखोरी
By admin | Published: July 12, 2017 4:37 AM