मडगाव : केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले असून सरकारची मेक इन इंडिया योजना अयशस्वी ठरली आहे. सरकारने योजना तयार करण्यासाठी कोणतेही नियोजन केले नव्हते, अशी माहिती प्राप्त झाली असल्याचे राज्यसभा खासदार अॅड. शांताराम नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.या वेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आल्तिन गोम्स व दक्षिण गोवा जिल्हा काँग्र्रेसचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.शांताराम नाईक म्हणाले की, काँग्रेस पक्षाने बांगलादेश सीमेच्या विषयावर सरकारला पाठिंबा दिला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस खाणाऱ्यांनी पाकमध्ये चालते व्हा, असे विधान केले होते. हे विधान देशद्रोही व संवेदनशील आहे. अर्थ राज्यमंत्री निर्मल सीताराम यांनी योजना तयार करण्यासाठी नियोजन केले नाही. डिसेंबर माहिन्यात केवळ एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी काही बुकलेट छापण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या खात्यामार्फत कामे केली जातील याची माहिती किंवा उल्लेख करण्यात आला नव्हता. केंद्र सरकारने मेक इन इंडिया संकल्पना वाऱ्यावर सोडली आहे. सरकारने केलेल्या प्रत्येक करामध्ये मेक इन इंडियाची संकल्पना येणे अनिवार्य होते, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
केंद्राची मेक इन इंडिया योजना अयशस्वी
By admin | Published: May 24, 2015 1:22 AM