पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. धावपट्टीचे नूतनीकरण व इतर डागडुजीही होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८३ कोटी ४0 लाख रुपये खर्चाच्या या विस्तारकामात धावपट्टीची क्षमता वाढविली जाईल. विमानांना सध्या जागा अपुरी पडते त्यामुळे अनेकदा येथे येणाºया चार्टर विमानांनाही पार्किंगसाठी अन्य विमानतळांवर जावे लागते. धावपट्टीची क्षमता वाढविल्याने विमानांचे वेळापत्रकही सुटसुटीत होईल तसेच अतिरिक्त पार्किंगची सोयही केली जाईल.गेल्या आॅक्टोबर महिन्यात या विस्तारकामासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार बी ४७४ या मोठ्या विमानांसाठी समांतर ट्रॅक तसेच धावपट्टीची सोय केली जाईल. दाबोळीचा हा विमानतळ नौदलाच्या ताब्यात आहे त्यामुळे विमानतळ प्राधिकरण व भारतीय नौदल खर्चाचा प्रत्येकी निम्मा वाटा उचलणार आहे. ३0 महिन्यांच्या कलावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या दाबोळी विमानतळावर गर्दीच्याक्षणी एकाचवेळी २७५0 प्रवाशी हाताळण्याची क्षमता आहे. या विमानतळावर पाच एअरोब्रीज आणि आठ विमाने पार्क करण्याची सोय आहे. ८ क्रमांकाच्या धावपट्टीजवळ समांतर ट्रॅक नसल्याने विमानांना सिव्हिल अॅप्रॉनमध्ये वळसा घेऊन यावे लागते त्यामुळे अन्य धावपट्ट्यांवरही विमानांच्या उड्डाणांवर तसेच लँडिंगवर परिणाम होतो. ही गैरसोय टाळण्यासाठी काही सुधारणा घडवून आणण्यात येणार आहेत.
मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्याने दाबोळी बंद होणार अशी भीती खास करुन दक्षिण गोव्यातील लोकांमध्ये होती. आता दाबोळीच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडूनच हिरवा कंदिल मिळालेला असल्याने ही भीती दूर होईल, अशी अपेक्षा आहे.एका अंदाजानुसार गोव्यात येणा-या विमान प्रवाशांची संख्या दरवर्षी साधारणपणे ३0 टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे दाबोळी आणि भविष्यात मोपा अशा दोन्ही विमानतळांची गरज भासणार आहे. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार गोव्याला वर्षाकाठी भेट देणाºया पर्यटकांची संख्या ८0 लाखांवर पोचली आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळाचा विस्तार आणि मोपा ग्रीनफिल्ड विमानतळ ही काळाची गरज असल्याचे गोवा टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचेही म्हणणे आहे.