किशोर कुबल
पणजी : दक्षिण गोव्यातील चांदर गावाचे पुरातत्व, सांस्कृतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन गोवा सरकारने या गावाला ‘हेरिटेज व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पात्र नामांकित सल्लागार आणि एजन्सींकडून मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी इच्छा प्रस्ताव मागवले आहेत. दहा वर्षांहून अधिक काळ अस्तित्व असलेली कोणतीही नोंदणीकृत असलेली तसेच वारसा स्थळ व्यवस्थापन आराखडा, हेरिटेज मॅनेजमेंट, संवर्धन, धोरण मसुदा, नियम आणि विनियमांचा मसुदा इत्यादी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेली एजन्सी इच्छाप्रस्ताव पाठवू शकते.
दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील चांदर गावात शिवमंदिराचे तसेच प्राचिन तटबंदीचे अवशेष आहेत. हेरिटेज हाऊस, चर्च, शिल्पाचे अवशेष इत्यादींची ही संरक्षित जागा आहे. याशिवाय प्राचीन ताम्रपटातील शिलालेखांमध्ये चांदर गावाचा उल्लेख चंद्रपूर असा आहे.गोव्यात असे अनेक गांव आहेत ज्यामध्ये हेरिटेज टुरीझम चालू शकते. त्यामुळे सरकारनेही आता पर्यटकांना किनाय्रांपासून दूर अंतर्गत भागांमध्ये सहलींसाठी वळवण्याचे ठरवले आहे.
अलीकडेच जाहीर झोलेले ‘होम स्टे’ धोरण व काराव्हॅन धोरण याचाच एक भाग आहे. जगातील अनेक राष्ट्रे अशा पर्यटनाला उत्तेजन देतात. हेरिटेज पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे संशोधक किंवा विद्यार्थी असतात. यापैकी काही जिज्ञासू असतात. राजा देवराज भोज यांची चांदर येथे राजधानी होती, राज्य होते. ती गोव्याची पहिली राजधानी होती. राजा भोजाच्या ताम्रपटात या गांवाला चंद्रऊर म्हणत होते, असा उल्लेख सापडतो. १३२० मध्ये मोहम्मद बीन तुघलकच्या सैन्याने चंद्रपूरवर हल्ला केला. पुढे चंद्रपूर पोर्तुगीजाच्या आक्रमणाला व बाटाबाटीला बळी पडले व चंद्रपूरचा अपभ्रंश चांद्रा असा झाला.