शहीद दिनाचा कार्यक्रम करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; दोघांमध्ये शाब्दिक चकमक
By पूजा प्रभूगावकर | Published: March 23, 2024 01:20 PM2024-03-23T13:20:44+5:302024-03-23T13:21:06+5:30
नागरिक व पालिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पणजी येथील आझाद मैदानावर शहीद दिना निमित कार्यक्रम आयोजित केलेल्या नागरिकांना शनिवारी पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी नागरिक व पालिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
लोकसभा निवडणूकीनिमित राज्यात आचारसंहिता लागू आहे. सदर कार्यक्रम आयोजित करुन आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवून सुमारे २० नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचा नागरिकांनी निषेध केला.
शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना पुष्पांजली वाहण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानावर शहीद दिनाचा कार्यक्रम फ्रेंड्स ऑफ भगतसिंग या संघटने खाली काही नागरिकांनी आयोजित केला होता. मात्र कार्यक्रम सुरु असताना अचानक काहींनी इव्हीएम विरोधात बोलण्यात सुरुवात केली. तेव्हाच पणजी पोलिसांनी हा कार्यक्रम बंद पाडला. त्यामुळे पोलिस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. कार्यक्रम बंद का पाडला जात आहे ? आम्हाला बोलण्यास का दिले जात नाही ? असा प्रश्न नागरिकांनी पोलिसांना केला. मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे न ऐकता कार्यक्रम बंद पाडून त्यांना ताब्यात घेतले.