शिवोलीतील नागरिकांचा पाण्यासाठी घेराव; पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By काशिराम म्हांबरे | Published: February 27, 2024 03:33 PM2024-02-27T15:33:20+5:302024-02-27T15:34:25+5:30
शिवोली मतदार संघातील काही भागात मागील महिनाभरापासून होणाऱ्या अनियमीत पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या तेथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील कार्यालयावर मोर्चा नेला.
काशिराम म्हांबरे
म्हापसा: शिवोली मतदार संघातील काही भागात मागील महिनाभरापासून होणाऱ्या अनियमीत पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या तेथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील कार्यालयावर मोर्चा नेला. तसेच सहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर याला घेराव घालून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
या घेरावात शापोरा, बादें, बोंदीरवाडा, आसगांव, मुड्डीवाडा, हणजूण या शिवोली मतदारसंघातील नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी साहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर यांच्या सोबत यावेळी कनिष्ठ अभियंता तनय कांदोळकर उपस्थित होते. या भागात मागील महिन्यापासून अनियमीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे अभियंत्याच्या लक्षात आणून देण्यात आले. जो पुरवठी होतो त्यातून लोकांची गरज भागवली जात नाही. टँकरातून पाणी विकत घेणे परवडत नाही. तसेच संबंधीत भागातील लाईनमन नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांकडून करण्यात आला.
पार्वती नागवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही भागात पुरवठा होत नसल्याने घेराव घालण्यात आला. काही भागात राजकिय हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मागील महिनाभरापासून होणारे त्रास दूर करावे अशी मागणी केली. लाईमनचा कमतरता दूर करावी अशी मागणी नागवेकर यांनी केली. सध्या अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन रणधीर अष्टेकर यांनी नागरिकांना दिले. तसेच शिवोलीतील प्रकल्पाचे तसेच वाहिन्या बदलण्याचे काम सुरु असून ते पूर्ण झाल्यावर पुरवठा सुरळीत होईल अशीही माहिती त्यांनी दिली.