पणजी : कर्नाटकात विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिल्याच्या पार्श्वभूमीवर हाच न्याय राज्यपालांनी गोव्यातही लागू करावा आणि काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे, अशी मागणी करीत काँग्रेसच्या १६ पैकी १३ आमदारांनी शुक्रवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन पत्र दिले. राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या १३ आमदारांनी दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली. कर्नाटकातील न्याय गोव्यातही लावावा आणि विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करावे, असे काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. या मागणीवर अभ्यास करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. काँग्रेस सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ७ दिवसांची मुदत राज्यपालांना दिली आहे.
राज्यपालांकडे या शिष्टमंडळाने सुमारे पाऊण तास चर्चा केली. आमदार इजिदोर फर्नांडिस हे आजारी असल्याने या शिष्टमंडळात उपस्थित नव्हते. तर आमदार सुभाष शिरोडकर व आमदार जेनिफर मोन्सेरात राज्याबाहेर असल्याने येऊ शकले नाहीत. आमचे सर्व आमदार एकसंध आहेत, असा दावा एका प्रश्नावर पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी केला.
संधी दिल्यास सात दिवसात बहुमत सिध्द करु : कवळेकर
- राजभवनवरुन परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, ‘काँग्रेसचे १७ आमदार असताना आणि विधानसभेत हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असताना १२ मार्च २0१७ रोजी राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊन मोठी चूक केली हे त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेले आहे. ही चूक त्यांनी सुधारावी आणि सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला निमंत्रण द्यावे, अशी मागणी आम्ही केलेली असून राज्यपालांनी संधी दिल्यास विधानसभेत सात दिवसात बहुमत सिध्द करु.’
पुरेसे संख्याबळ : चोडणकर यांचा दावा
- प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ आहे. २१ आमदार आमच्याकडे असून विधानसभेत आम्ही बहुमत सिध्द करु शकतो. त्यासाठी भाजप आमदारांचीही फोडाफोडी करावी लागणार नाही, असे ते म्हणाले. कर्नाटकात राज्यपालांनी विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावले. तोच न्याय गोव्यातही लावावा, अशी मागणी आम्ही केली आहे. कर्नाटकात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयानंतर गोव्यात राज्यपालांना आपल्या हातून चूक घडल्याची प्रचिती आली असावी कारण त्यांच्याशी चर्चेच्यावेळी तरी निदान तसे जाणवले. आमच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे गिरीश यांनी सांगितले.
अशी आहे पार्श्वभूमी
२0१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ १३ जागा तर काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आणि भाजपने गोवा फॉरवर्ड व मगोपचे प्रत्येकी ३ आमदार तसेच ३ अपक्षांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन केले. कालांतराने विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. आज ते सरकारात आरोग्यमंत्री आहेत.