लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत दाखल झाले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी तसेच गोव्यासाठी नवीन पक्ष प्रभारी यासंबंधी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
प्रदेश भाजपने लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिकंण्यासाठी कंबर कसली आहे. कोअर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता. मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. नड्डा यांना येथील तयारीची माहिती मुख्यमंत्री देतील.
दरम्यान, सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावरुन दूर केल्याने गोव्याच्या पक्ष प्रभारीपदी नवीन नेता येणार आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झालेली आहे. त्यांना गोव्याचा खडानखडा माहिती आहे. याआधी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांवेळी तावडे अनेकदा गोव्यात येऊन गेलेले आहेत. त्यामुळे गोवा प्रभारीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे. नड्डाजी याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी बोलतील, असे सूत्रांकडून समजते.
१८ जुलैपासून १० ऑगस्टपर्यंत चाललेले दीर्घकालीन पावसाळी विधानसभा अधिवेशन व त्यानंतर महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या गोवा भेटीची तयारी यामुळे मुख्यमंत्री पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या भेटीसाठी दिल्लीला जाऊ शकले नव्हते. काल राष्ट्रपती तीन दिवसांचा गोवा दौरा आटोपून परतल्या आणि मुख्यमंत्र्यांनी नंतर दिल्ली गाठली. लोकसभा निवडणूक, नवीन पक्षप्रभारी याबरोबरच इतर संघटनात्मक गोष्टींवरही मुख्यमंत्र्यांची नड्डा यांच्याशी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीत वेगवेगळ्या केंद्रीय नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. एसटी समाजाला विधानसभा आरक्षणाचा विषय ते केंद्रीय मंत्री आणि पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे मांडण्याची शक्यता आहे.