किनाऱ्यांची झीज
By Admin | Published: February 25, 2017 01:52 AM2017-02-25T01:52:01+5:302017-02-25T01:56:49+5:30
पणजी : गोव्यातील १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी २०.२४ टक्के किनाऱ्यांची झीज झालेली आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष
किनाऱ्यांची झीज
पणजी : गोव्यातील १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी २०.२४ टक्के किनाऱ्यांची झीज झालेली आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेन्ट (एनसीएससीएम) या यंत्रणेने आपल्या अहवालातून काढला आहे.
५२ टक्के किनारपट्टी खडकाळ स्वरूपाची आहे, असेही या यंत्रणेने म्हटले आहे. गोव्याच्या कुठच्या भागात किनारपट्टीची स्थिती कशी आहे व किती शॅक किंवा शॅकवजा झोपड्या, कॉटेजीस किनारपट्टीवर राहू शकतात याबाबतचा अहवाल तथा अंतिम मसुदा तयार करून नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेन्ट यंत्रणेने किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणास दिला आहे. या मसुद्याचा सध्या अभ्यास सुरू आहे. किनारपट्टीतील बदलाची सॅटलाईटद्वारे इमेज प्राप्त करून एनसीएससीएमने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, गेल्या ३२ वर्षांच्या कालावधीत गोव्याच्या किनाऱ्याची झीज होण्याच्या प्रक्रियेत व गाळमाती किनाऱ्यावर साठण्याच्या प्रक्रियेत मोठा फरक जाणवत आहे. मोरजी, बागा, कांपाल, मिरामार आणि मोबोर येथे गाळमाती आढळून येते तर केरी, हणजूण व वेळसाव येथे किनाऱ्याची झीज झाली असल्याचे स्पष्ट होते. किनारपट्टीतील भूजलावर लक्ष ठेवून भूजलाच्या दर्जाची देखरेख करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखडा तयार करावा, अशी शिफारस अहवालातून केली गेली आहे.
गोव्यात एकूण ३९ गावे अशी आहेत, जिथे मासेमारीचा व्यवसाय चालतो. २ हजार ३७० सक्रिय असे मच्छीमार राज्यात असून त्यापैकी १ हजार ५०५ पूर्णवेळ मच्छीमार आहेत. सरकारने मासेमारीची ही गावे अधिसूचित करावी आणि तिथे मच्छीमारांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी शिफारस अहवालात आहे. खाजन जमिनी व वाळूच्या पट्ट्यांचे मॅपिंग करावे तसेच बागा ते सिकेरी या पट्ट्यातील खासगी जागेत शॅक्स, झोपड्या, कॉटेजीस उभे करण्यास सरसकट परवानगी देऊ नये, असेही अहवालात म्हटले आहे. गोव्यात खारफुटीची कत्तल करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. एकूण सोळा जातींची खारफुटी गोव्यात सापडते, असे वैशिष्ट्यही नमूद केले गेले आहे.
पाळोळे किनाऱ्याची क्षमता पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिथे आणखी एकाही शॅकला सरकारने परवानगी देऊ नये, असे अहवालात म्हटले आहे.
(खास प्रतिनिधी)