पणजी: मागील १०० दिवसांपासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा दावा करून काँग्रेस विधीमंडळ मंडळाने राष्ट्रपतीला साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे. कवळेकर यांनी आपल्या विधानसभेतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यातील समस्यांवर गंभीर चर्चा केली. तसेच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाय योजनेचेही प्रस्ताव तयार ठेवले आहेत. पहिली समस्या म्हणजे गोव्याला मुख्यमंत्री नसणे आणि ती सोडविण्यासाठी काँग्रेसचे आमदार राष्ट्रपतीना भेटणार आहेत. अद्याप तारीख ठरली नसली तरी लवकरच भेटणार आहेत असे त्यांनी सांगितले. खाण बंदीमुळे लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजप सरकार असून सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. या सरकारने खाण प्रकरणात तोडगा काढल्यास सरकारचा काँग्रेसचा पाठिंबा राहील. परंतु सरकार काही करतच नाही हे खरे दु:ख आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फेच काही तरी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू असून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही घेतला आहे अशी माहिती कवळेकर यांनी दिली. यावर विचार विनिमय करण्यासाठी प्रतापसिंग राणे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती काढण्यात आली आली असून बुधवारी त्यांची बैठक होणार आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले ४ हजार रुपये बेकारी भत्ता देण्याचे आश्वासनाची पूर्ती करण्याची ही वेळ असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. ही योजन त्वरीत लागू करण्याची मागणी त्यांनी केली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासह बहुतेक सर्व आमदार उपस्थित होते. आमदार इजिदोर फर्नांडीस हे आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रपतींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:46 PM