काँग्रेस आमदारांचा भाजपाकडून छळ, हळर्णकरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:39 PM2019-06-13T13:39:34+5:302019-06-13T13:44:25+5:30
भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला.
पणजी - भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला.
काँग्रेसचे दहा आमदार भाजपामध्ये नुकतेच येऊ पाहत होते पण आम्ही त्यांना भाजपामध्ये घेतले नाही, अशी माहिती बुधवारीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व हळर्णकर यांनी काँग्रेसची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. हळर्णकर म्हणाले, की पूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे ध्येय आहे असे भाजपाचे राष्ट्रीय नेते सांगतात. मग जर काँग्रेसच्या एकूण पंधरापैकी दहा आमदार भाजपामध्ये येत होते ही गोष्ट खरी असेल तर तेंडुलकर यांनी ती संधी कशी सोडली असा प्रश्न निर्माण होतो. कारण दहा आमदार पक्षाला सोडून भाजपामध्ये गेले तर गोवा काँग्रेसमुक्त करण्याच्या दिशेने ते भाजपाचे मोठे पाऊल ठरले असते. भाजपाचे नेते खोटे बोलतात.
हळर्णकर म्हणाले, की यापूर्वी शिरोडकर यांचा 70 कोटींच्या जमिनीच्या विषयावरून भाजपाने छळ केला व शिरोडकर कंटाळून भाजपामध्ये गेले. सोपटेंच्या मतदारसंघातही भाजपाने विकास कामे रोखली होती व त्यामुळे सोपटेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या आमदारांचा अशा प्रकारे छळ करणे हे भाजपाचे तंत्र आहे. आपण तर भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण माझा जन्मच सॅक्युलर पक्षासाठी झाला आहे.
चोडणकर म्हणाले, की भाजपाचे नेते साठ कोटी रुपयांचे पॅकेज घेऊन फिरत होते. काँग्रेसच्या आमदारांनी ते पॅकेज नाकारले. आम्ही भाजपाची पॅकेज पद्धत उघडी पाडली व त्यानंतर स्वत:ची लाज राखण्यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे दहा आमदार फुटण्यासाठी प्रस्ताव घेऊन आले होते, अशी खोटी कथा तयार केली. भाजपाच्या नेत्यांनी कधी तरी खरे बोलावे. भाजपावाले कॅसिनो जुगारप्रश्नी सध्या जे काही बोलतात ते ऐकून लोक त्यांना हसतात.