गोव्याच्या मंत्र्याविरुद्ध काँग्रेस पक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 10:37 AM2017-10-21T10:37:06+5:302017-10-21T10:37:39+5:30
गोव्याचे आरोग्य मंत्री तथा भाजपाचे आमदार विश्वजित राणे यांना अपात्र ठरविले जावे म्हणून गोव्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्याचे ठरवले आहे.
पणजी - गोव्याचे आरोग्य मंत्री तथा भाजपाचे आमदार विश्वजित राणे यांना अपात्र ठरविले जावे म्हणून गोव्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्याचे ठरवले आहे.
विश्वजीत राणे हे अलिकडेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वाळपई मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. तत्पूर्वी ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते पण निवडून येऊन लगेच त्यानी आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी विश्वजित राणे यांनी केलेली कृती ही त्यांच्या अपात्रतेला कारण ठरते असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला त्यावेळी विश्वजित यानी विरोधात मतदान करायला हवे होते पण ते मतदानाप्रसंगी सभागृहात मुद्दाम अनुपस्थित राहिले असे काँग्रेसचे म्हणणे आहे. अगोदर विश्वजित यांनी व्हीपचे पालन केले नाही, मग त्यानी आमदारकीचा राजीनामा दिला असा दावा करून काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात विश्वजितविरूद्ध अपात्रता याचिका सादर केली होती. न्यायालयात त्यावर काही महिने सुनावणी झाली. विश्वजितविरूद्ध विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्यासमोरही अपात्रता याचिका आहे. त्यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळली. सभापतींसमोरील याचिकेवर सभापतीनी अजून निवाडा दिलेला नाही.
काँग्रेसने आता उच्च न्यायालयाच्या निवाड्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा प्रभारी चेल्लाकुमार यानी याविषयीचे सूतोवाच केले आहे. तथापि, आपला न्याय संस्थेवर पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया मंत्री विश्वजित यानी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे काही आमदार घोटाळ्यांमध्ये अडकले असून त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहे असे विश्वजित म्हणाले.