थकलेल्या काँग्रेसने आता 'आरजी'ला पाठिंबा द्यावा!; मनोज परब यांची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:06 PM2023-12-21T13:06:45+5:302023-12-21T13:08:05+5:30
जिंकल्यानंतर 'इंडिया'लाच साथ देऊ.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही दोन्ही मतदारसंघात आरजी पक्षाचे उमेदवार जाहीर केले. काँग्रेसला विलंब झालेला आहे. इंडिया ब्लॉक आता खूप उशिरा स्थापन झाला आहे. गोव्यात तरी काँग्रेस पक्ष थकला आहे, काँग्रेसला जर उत्तर व दक्षिणेत भाजपला हरवायचे असेल तर काँग्रेसने आरजीच्याच उमेदवारांना पाठींबा द्यावा व घरबसल्या दोन जागा मिळवाव्यात, अशी ऑफर आरजीचे प्रमुख मनोजलो परब यांनी काल दिली.
लोकमतच्या कार्यालयास परब यांनी भेट देऊन संपादकीय विभागाशी मुक्त संवाद साधला. काँग्रेसने जर आम्हाला पाठिंबा दिला तर त्या पक्षाला उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही जागा आपण (म्हणजे काँग्रेसने) आरामात जिंकल्या, असे समाधान मिळेल. आम्ही आरजीचे कार्यकर्ते व आरजीचाच पैसा वापरून दोन्ही जागा लढवतो. शेवटी दोन्ही उमेदवार जिंकून आले की ते काँग्रेसप्रणीत इंडिया ब्लॉकलाच पाठिंबा देणार आहेत, असे परब यांनी सांगितले. परब हे आरजीतर्फे उत्तर गोव्यातून लढत आहेत.
दीड-दोन वर्षांपासून आमचे कार्यकर्ते गोव्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकसभेच्यादृष्टीने काम करत आहेत. गोमंतकीयांच्या समस्या जाणून घेत आहेत. म्हणूनच वेळ न दवडता रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने दोन्ही उमेदवार जाहीर केल्याचे सांगत परब म्हणाले की, काँग्रेससह २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची स्थापना होऊन सहा महिने झाले. मात्र आमच्याशी अद्याप कुणीही संपर्क साधलेला नाही. तरीही लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मोदींच्या एनडीएसोबत जाणार नाही.
गोवा आज गोमंतकीयांच्या हातून जात आहे. ग्रामीण भागात रस्ते नाहीत, शाळांची दुरवस्था आहे, गुन्हेगारी वाढत चालली आहे. मात्र, सरकार लोकांपुढे विकासाचे आभासी चित्र निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मनोज परब म्हणतात...
कर्ज काढून सरकार १ विकास करत आहे. तब्बल ३४ हजार कोटींचे राज्यावर कर्ज आहे. प्रशासन सुस्त असल्यामुळेच गोवा गुन्हेगारांचे अश्रयस्थान बनत चालले आहे. नोकरीनिमित्त राज्यात येणाऱ्यांची सक्तीने नोंद होणे गरजेचे. ३० ते ४० ३ वर्षापासून पालेभाज्या, फळे, फुले विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांना हक्काची जागा नाही, रस्त्यावर, मार्केटबाहेर उभे राहून व्यवसाय करण्याची वेळ. विद्यमान खासदारांची गोव्यासाठी शून्य कामगिरी, संसदेत हजेरी लावण्याचेच केले काम.
दक्षिणेत दिला 'एसटी' उमेदवार
आरजीने दक्षिण गोव्यातील जाहीर केलेला उमेदवार रुबर्ट परेरा हा एसटी समाजातून आलेला आहे. तो विदेशात खलाशी म्हणून काम करायचा. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्याने कामावर न जाता आरजीच्या कामात स्वतःला झोकून दिले. कुडतरीतून विधानसभा निवडणूक लढवताना ३,५०० हजार मते मिळवली होती. सामान्य कुटुंबातून आलेल्या रुबर्टला लोकांचे प्रश्न माहिती असून त्याला संधी दिल्यास निश्चितच तो लोकांना न्याय देऊ शकतो, असेही परब यांनी सांगितले.
हक्काची व्होट बँक परत मिळवू
भाजप, काँग्रेसने स्थानिक राजकीय पक्षांची हक्काची व्होट बँक हिरावली आहे. हीच व्होट बँक आम्हाला पुन्हा मिळवायची आहे. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आरजी आज विविध माध्यमातून भूमीपुत्रांचे विषय मांडत आहे. आमचा परप्रांतीयांना विरोध नाही. पण, बाहेरून येणाऱ्यांनी कायदेशीररित्या वास्तव्य करावे, असे परब यांनी सांगितले.