शिवोली-सडयें येथील वादग्रस्त धर्मगुरुंना अटक
By काशिराम म्हांबरे | Published: January 1, 2024 10:30 AM2024-01-01T10:30:59+5:302024-01-01T10:32:27+5:30
म्हापसा पोलिसांकडून धर्मांतरण तसेच काळा जादूच्या आरोपाखाली अटक केली आहे.
काशिराम म्हांबरे, म्हापसा: शिवोली-सडयें येथील वादग्रस्त तथा स्वयंघोषीत फाईव्ह पिलर चर्चचे धर्मगुरु डॉन्मिक डिसोझा यांना म्हापसा पोलिसांकडून धर्मांतरण तसेच काळा जादूच्या आरोपाखाली अटक केली आहे. यापूर्वी सुद्धा त्याला अशाच प्रकरणात अटक झाली होती.
उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे दरम्यान ही अटक करण्यात आली. या संबंधी मूळ तामिळनाडू व फोंडा येथे वास्तवास असलेल्या ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. संशयिताने आपल्या धर्मांतरासाठी धमकावल्याचे तसेच प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्यासाठी आमिष दाखवल्याचे कथित आरोप फिर्यादीने तक्रारीतून केले आहेत.
डॉन्मिकसोबत त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हस यांच्या विरोधात नोंद करण्यात आलेला अशा प्रकारचा हा तिसरा गुन्हा आहे.भा.दं.सं. कलम १५३ ( अ), २९५(अ), ५०६(२), ३४ तसेच ड्रग्स अँड मॅजिक रेमेडियस कायदा १९५४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.