पणजी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याने कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे कडक निर्बंध योजिले आहेत. काही निर्बंधांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे पण गोवा सरकारने लॉकडाऊन करणे टाळले आहे. शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये नवे हजारो कोविडग्रस्त आढळत असल्याने गोवा खूप सावध व सतर्क झाला आहे. देशी पर्यटकांची सध्या गोव्यात गर्दी असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, दिल्ली येथील पर्यटक गोव्याच्या किनारपट्टीत फिरताना आढळतात.
गोव्यात अलिकडेच चोवीस तासांत सोळा पर्यटक कोविड पॉझिटीव आढळले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पर्यटकांना सावध केले आहे. गोवा सरकारने निर्बंध लागू करताना पर्यटकांनाही दंड ठोठवणे सुरू केले आहे. जे पर्यटक तोंडाला मास्क न बांधता फिरतात, त्यांच्या दुचाक्या अडवून त्यांना थांबविले जाते. पोलिसांकडून त्यांना दंड ठोठविला जातो. गोव्याच्या किनाऱ्यांवर पर्यटक गर्दी करतात, तिथे पोलिस जातात व तिथेही त्यांना सोशल डिस्टनसींग न पाळल्याबाबत दंड ठोठवला जातो. गोव्यात मोठे सोहळे आयोजित करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. बंद खोलीत जर बैठक किंवा कार्यक्रम असेल तर फक्त पन्नास लोकांना बोलविता येते व उघड जागेत कार्यक्रम होत असेल तर दोनशे व्यक्तींना त्यासाठी निमंत्रित करता येते अशा प्रकारचे निर्बंध आहेत. विवाह सोहळ्यांनाही जास्त गर्दी निमंत्रित करता येत नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला व लॉकडाऊन हा पर्याय नव्हे असे सांगितले. गोवा सरकारनेही लॉकडाऊन करायचेच नाही असे ठरवले आहे. गोव्यात नाईट कर्फ्यूही नाही पण पर्यटकांनी तोंडाला मास्क बांधावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. लोकांनी निर्बंध पाळले तरच गोव्यात कोविड लवकर नियंत्रणात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण गोव्यात सध्या पाच हजार सक्रिय कोविड रुग्ण आहेत.