CoronaVirus News: भीती थोडी थोडी दूर; मडगाव येतंय पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 07:59 PM2020-06-09T19:59:47+5:302020-06-09T20:01:09+5:30
काही दिवसांपूर्वी मडगावात मालभाट आके व जुंता क्वाटर्स या परिसरात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. हे दोघेही वास्को आरोग्य केंद्राशी निगडीत होते. या बातमीने दोन्ही परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
मडगाव: मडगावात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये जे भीतीचे वातावरण पसरले होते ते हळूहळू दूर होत असून मडगाव पूर्वपदावर येऊ लागले आहे.
काही दिवसांपूर्वी मडगावात मालभाट आके व जुंता क्वाटर्स या परिसरात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. हे दोघेही वास्को आरोग्य केंद्राशी निगडीत होते. या बातमीने दोन्ही परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
जुंता क्वाटर्स इमारतीत राहणारे मडगावचे माजी नगरसेवक राजू नाईक म्हणाले, ज्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे त्या तरुणाच्या घरातील तिन्ही व्यक्ती निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सध्या हा परिसर भयमुक्त झाला आहे.
सध्या ह्या कुटुंबियांना घरातच विलग करून ठेवण्यात आले असून त्यांचे शेजारी त्यांना कुठलीही वस्तू हवी असल्यास मदत करत आहेत. हा परिसर सोमवारी पूर्णपणे सॅनिटाईझही करण्यात आला होता.
मालभाट परिसरही हळूहळू भीतीच्या सावटातून बाहेर येत असून लोकांचे नित्याचे काम सुरू झाले आहे. या भागात ज्याला कोरोना झाला होता त्याच्या घरचे सात जण निगेटिव्ह आल्याने लोकांची भीती दूर झाली असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी दिली.
ते म्हणाले, सुरवातीला लोक काही प्रमाणात घाबरले होते कारण ज्या घरात कोरोना रुग्ण आढळला ते कुटुंबीय सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असत पण नंतर या भागात असलेल्या चार शौचालयापैकी एक शौचालय या कुटुंबालाच वापरायला दिल्याने ही समस्या दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हा परिसरही दोन वेळा सेनीटायझ करण्यात आला. त्याशिवाय 200 मीटर परिधातील सर्व व्यक्तींची आरोग्य खात्याकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.
ज्या भागात हे रुग्ण आढळून आले ते जुंता क्वाटर्स व मालभाट हे दोन्ही परिसर दाट लोकवस्तीचे असल्याने सुरवातीला लोक बरेच घाबरले होते. दरम्यान सोमवारी जुंता क्वाटर्समध्ये आणखी एक कोरोना रुग्ण आढळला असे वृत्त पसरले होते मात्र हे वृत्त निराधार असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
दरम्यान, मडगावचा बाजारही हळूहळू या भीतीच्या सावटातून बाहेर आला असून लोकांची बाजारात आता वर्दळ वाढू लागली आहे.
केपे व सांगे तालुक्यात प्रत्येकी दोन पॉझिटिव्ह
केपे व सांगे या दक्षिण गोव्यातील ग्रामीण भागातील तालुक्यात प्रत्येकी दोन कोरोना बाधित आढळल्याने या भागातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या चारपैकी तिघेजण वास्को आरोग्य केंद्राशी संबंधित आहेत.
केपे तालुक्यात पिर्ला या भागातील पण वास्को आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या युवतीला तसेच असोलडा येथे राहणाऱ्या आणि वास्को आरोग्य केंद्रात चालक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बाधा झाली आहे. मात्र लोकांनी यामुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक यांनी केले आहे. रुग्णांची सेवा करताना त्यांना ही बाधा झाली आहे त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. सांगे येथेही वास्को आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तसेच कदंबच्या एका चालकाला कोरोनाची बाधा झाली आहे.