कारकून भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार
By admin | Published: September 29, 2015 01:50 AM2015-09-29T01:50:41+5:302015-09-29T01:50:52+5:30
पणजी : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मागील वर्षी करूनही पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी
पणजी : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मागील वर्षी करूनही पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप युनायटेड गोवन्स फाउंडेशनच्या पदाधिकारी स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत
केला.
फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष केणी व सचिव अविनाश तावारीस उपस्थित होते. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात १३ अव्वल कारकून पदे भरण्यात आली होती. या पदांच्या भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी ११ सप्टेंबर २0१४ मध्ये मडगाव पोलीस स्थानकात फाउंडेशनतर्फे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही, असे केरकर म्हणाल्या.
या प्रकरणाची तक्रार गृह खाते आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाकडेही करण्यात आली. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने व भ्रष्टाचारविरोधी पथकाने एफआयआर नोंद करावा, असा आदेश दिला होता. मात्र, अजूनही आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. कारकून पदासाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांनी संगणकीय अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे बनावट जोडली आहेत. तर काही उमेदवारांना जाणूनबुजून लेखी परीक्षेत ज्यादा तर काहींना कमी गुण देण्यात आले आहेत. याशिवाय बनावट संगणकीय प्रमाणपत्र लावलेल्यांमध्ये सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे केरकर म्हणाल्या.
(प्रतिनिधी)