- नारायण गावस
पणजी: समुपदेशकांनाही शांत राहून सर्व विषय साेडविण्यासाठी काही काळ ध्यान करणे गरजेचे आहे. त्यांना सर्व गोष्टींचा ताण असल्याने त्यांनी स्वत:साठी वेळ दिला पाहिजे, असे गोवा शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष गाेविंद पर्वतकर यांनी सांगितले. गोवा शिक्षण मंडळ तसेच प्रोजेक्ट पर्ल एनजीओतर्फे पणजीत समुपदेशकांसाठी ज्युवेनाईल जस्टीस ॲक्ट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रोजेक्ट पर्लच्या बिना माटीर्न्स तसेच खास मुंबईच्या प्रसिद्ध वकील साजिया मुकादम यांनी या समुपदेशकांना मार्गशर्दन केले.
वाढता मानसिक ताण लाेकांची बदलती मानसिकता यासाठी प्रत्येक क्षेत्रात आज समुपदेशकांची गरज आहे. आम्ही आमच्या शिक्षण मंडळातर्फे या समुपदेशकांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांवरील ताण त्यांना असलेले शिक्षणाची भिती अशा विविध प्रश्नांचे निवारण केले जाते. पण समुपदेशकांना अशा प्रकारे सर्व विषय हाताळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण गरजेचे आहे. यासाठी प्रोजेक्ट पर्लतर्फे हे खास आम्ही समुपदेशकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असून यातून त्यांना नक्कीच मदत हाेणार आहे, असेही पर्वतकर म्हणाले.
बिना मार्टिन्स म्हणाल्या आम्ही आमच्या एनजीओमार्फत गेली २० वर्षे अशा विविध विषयावर काम करतो. यात लहान मुलांचे अपहरण, अनाथ मुलांचे जीवन, तसेच इतर मुलांवर हाेत असलेले अन्यायाचे विषयही हाताळत असतो. समाजात ही गुन्हेगारी कमी करता येईल यासाठी आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. मानवी तस्करी थांबविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असेही त्या म्हणाल्या.