पणजी : अव्वल कारकून भरती प्रकरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात दक्षिण गोव्याचे माजी जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल, तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी व्हेनान्सियो फुर्तादो आणि १३ उमेदवारांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी संतोष कुंडईकर व सुरेंद्र यांच्या विरोधातही गुन्हा नोंदविला आहे. अव्वल कारकून भरतीची सुरुवात जून २००३ साली झाली होती. नंतर ही भरती प्रक्रिया लांबली होती. भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या स्वाती केरकर यांनी ११ सप्टेंबर २०१४ रोजी मडगाव पोलीस स्थानकात नोंदविली होती. ही तक्रार दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी पणजी पोलीस मुख्यालयात पाठविली होती. मुख्यालयातून नंतर ती गृहखात्याकडे पाठविण्यात आली होती. गृहखात्याकडून या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी पथकाला ती तपासासाठी सोपविण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर या प्रकरणात फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे तसेच कायदे व नियमांना बगल देऊन ही भरती करण्यात आल्याचे पुरावे आढळून आल्यामुळे ती बुधवारी नोंदविण्यात आली. भारतीय दंड संहिता कलम ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कारकून भरती घोटाळाप्रकरणी गुन्हे
By admin | Published: October 01, 2015 1:34 AM