घटनात्मक पेचप्रसंगाविरुद्ध काँग्रेस हायकोर्टात जाणार, राज्यपालांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 07:54 PM2018-05-12T19:54:21+5:302018-05-12T19:54:21+5:30
राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
पणजी : राज्याला मुख्यमंत्रीच नाही व मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नाहीत. यामुळे सरकारी कारभार ठप्प झाला असून राज्यात जो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास याचिका सादर करण्याची शक्यता काँग्रेस पक्ष पडताळून पाहत आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेसने शनिवारी येथे स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रवक्ते रमाकांत खलप, यतिश नायक व आमदार टोनी फर्नाडिस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. खलप म्हणाले, की पेचप्रसंगाची सुमोटो पद्धतीने न्यायालयाने दखल घ्यावी अशी विनंती आहे. घटनात्मक यंत्रणाच गोव्यात अस्तित्वात राहिलेली नाही. काँग्रेस पक्षही न्यायालयास याचिका सादर करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. आम्ही विचार करत आहोत. न्यायालयाने दखल घेण्यासारखी स्थिती गोव्यात आहे.
चोडणकर म्हणाले, की राज्यपालांना काँग्रेसने निवेदन सादर केले होते पण त्यांनी काही कृती केली नाही. राज्यपालांनी 23 दिवसांनंतर आता आमच्या निवेदनाला प्रतिसाद देणारे पत्र लिहिले आहे. तुमचे निवेदन आपण राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवून दिल्याचे राज्यपालांनी काँग्रेसला कळवले आहे. हे करण्यासाठी त्यांना तेवीस दिवसांचा कालावधी लागला, यावरून कोणतीच यंत्रणा सध्या काम करत नाही हे स्पष्ट होते. राजभवनवरून चालत देखील कुणी पर्वरीला मुख्य सचिवांकडे जायचे असे ठरवले तर एका दिवसात जाऊन तिथे परत येता येते पण राज्यपालांनी मुख्य सचिवांकडे काँग्रेसची मागणी पोहचविण्यासाठी तेवीस दिवसांचा कालावधी घेतला. काँग्रेसच्या मागण्या काय आहे ते पाहण्यासाठीही राज्यपालांना वेळ नाही. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत सरकार साधे बुलेटीन देखील जारी करत नाही. फक्त ते उपचारांना प्रतिसाद देतात एवढेच तीन महिने सांगितले जात आहे.
चोडणकर म्हणाले, की गेले तीन महिने प्रशासन ठप्प आहे. तीन महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळाची बैठक झाली. गोव्याला मुख्यमंत्रीच नाही. गोव्यात आपले लाखो सदस्य आहेत असे भाजपचे नेते सांगतात. मुख्यमंत्रीपदासाठी पात्र असा एक देखील सदस्य त्यांना ह्या लाखोंमधून मिळत नाही काय? अमित शहा यांनी गोल्याला दुसरा मुख्यमंत्री द्यावा. त्यांना लोकांनी कौल दिला नव्हता पण बळजबरीने भाजपने सरकार घडविले व आता गोव्याला नेतृत्वहीन करून ठेवले आहे. तुम्ही नवा सीएम द्या किंवा सत्ता सोडा अशी मागणी आम्ही शहा यांच्याकडे आज रविवारी करणार आहोत.
काँग्रेस पक्ष अमित शहा यांच्यासमोर पाच प्रश्न मांडणार आहे. म्हादई पाणी प्रश्नीही त्यांना जाब विचारला जाईल, असे यतिश नायक व खलप यांनी नमूद केले.