नृत्याचे कार्यक्रम पर्यटकांसाठी मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:15 PM2019-12-24T13:15:12+5:302019-12-24T13:15:28+5:30
नाताळ सणापासून ते नवीन वर्षापर्यंत गोवा व नृत्य रजनीचे कार्यक्रम असे समिकरण झाले आहे. झालेल्या या समिकरणाच्या आकर्षणापायी लाखोंनी पर्यटक या आठ दिवसांच्या कालखंडात गोव्यात दाखल होत असतात.
म्हापसा : नाताळ सणापासून ते नवीन वर्षानिमित्त देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ ज्या कारणासाठी गोव्यात असतो त्या नृत्य रजनीच्या कार्यक्रमांचे रेलचेल पुढील ८ दिवसात सर्वत्र होणार आहे. खास करून किनारी भाग नृत्याच्या कार्यक्रमातून फुलून जाणार असून पर्यटकांसाठी हे कार्यक्रम आकर्षणाचा विषय ठरलेला आहे.
नाताळ सणापासून ते नवीन वर्षापर्यंत गोवा व नृत्य रजनीचे कार्यक्रम असे समिकरण झाले आहे. झालेल्या या समिकरणाच्या आकर्षणापायी लाखोंनी पर्यटक या आठ दिवसांच्या कालखंडात गोव्यात दाखल होत असतात. त्यातील बहुतेकांचा आश्रय किनारी भागच असतो तर शेजारील राज्यातले पर्यटक स्वत:च्या वाहनाने गोव्यात येऊन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पुन्हा त्याच वाहनाने निघून जातात. आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमात तारांकित हॉटेल्स सोबत बिगर तारांकित हॉटेल्स, विविध क्लब तसेच खासगी संस्थांचा सुद्धा समावेश असतो. यातील बहुतेक कार्यक्रम परिसरातील खुल्या जागेत भरवले जातात. येणारे काही पर्यटक किनाºयावरील शॅकात बसून आनंद लुटत असतात. पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी विविध क्लृप्त्या केल्या जातात.
या दिवसात गोव्यातील उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातल्या हरमल, मोरजी किनाºयापासून ते बार्देशातील कळंगुट, बागा, हणजूण, वागातोर तसेच दक्षिणेतील वार्का, माजोर्डा, कोलवा, बोगमालो, आश्वे, पाळोळे सारख्या किनारपट्टीवर स्वतंत्रपणे संगीत रजनीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पहाटे उशीरापर्यंत सुरु राहणाºया या कार्यक्रमांत पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना तयार करण्यात आलेल्या आहेत.
काही कार्यक्रमांना प्रवेश मोफत ठेवला जातो तर काही कार्यक्रमांना प्रवेश शुल्क लागू करून इतर सवलती दिल्या जातात. सतत तीन ते पाच दिवसांचा कार्यक्रम असल्यास विशेष पॅकेज सुद्धा दिले जाते. या संगीत रजनीत काही ठिकाणी सिनेतारकांच्या नृत्य रजनीचा कार्यक्रम, काही परिसरात विदेशी कलाकार, आरजे संगीत असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर काही ठिकाणी दारूकामाच्या आतषबाजीचे आकर्षण, खाद्य पदार्थांचे आकर्षण सुद्धा ठेवले जाते. या खाद्य पदार्थात गोव्यातील रुचकर पारंपारिक असे पदार्थ सुद्धा आकर्षणाचा भाग असतात.
बागा, कळंगुट, हणजूण, वागातोर परिसरातील संगीत रजनीचे कार्यक्रम करणारे क्लब विशेष आकर्षण ठरत असतात. यात टिटोस् नाईट क्लब, सिंक, कुर्लीस, क्लब एलपीके यांचा समावेश आहे. काही कार्यक्रम चर्चीतील मध्यरात्रीची प्रार्थना संपल्यानंतर आयोजित करण्यात आले आहेत तर काही कार्यक्रम नाताळाच्या दिवशी आयोजित करण्यात आले आहेत. आयोजित होणारे हे कार्यक्रम पर्यटकांसाठी मात्र मेजवानी ठरणार आहेत.