लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी (दि. ५) गोवा भेटीवर येत आहेत. वेरे येथे आयएनएस मांडवी नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन ते करणार आहेत.
नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर अॅडमिरल अर्जुन देव नायर यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. या इमारतीमुळे संस्थेला लष्करी सेवेतील अधिकाऱ्यांना सध्याच्या क्षमतेच्या तिप्पट संख्येने प्रशिक्षित करता येईल. चोल वंशाच्या पराक्रमी सागरी साम्राज्याच्या स्मरणार्थ या इमारतीला 'चोल' असे नाव देण्यात आले आहे. उद्घाटनाला नेव्हल वॉर कॉलेजच्या माजी कमांडंटसह वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय नौदलातील मधल्या स्तरावरील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यावसायिक लष्करी प्रगत शिक्षण देण्यासाठी मुंबईत १९८८ मध्ये 'आयएनएस कारंजा' येथे नौदल युद्ध महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. २०११ साली ते गोव्यातील सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.