पणजी : गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे सोमवारी सायंकाळी सुमारे पाच तास मुंबई विमानतळावर अडकून राहिले. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता ताबा असलेले डिसोझा हे दिल्लीला काही कामानिमित्त गेले होते. दिल्लीहून एका विमानाने आल्यानंतर दुसरे विमान पकडून गोव्याला यावे असा बेत त्यांनी आखला होता. दिल्लीतच त्यांचे विमान सुटण्यास विलंब झाला. त्यामुळे ते मुंबई विमानतळावर पावणे सहा वाजता पोहचले. परिणामी त्यांना मुंबईहून गोव्याला यायचे विमान चुकले. सायंकाळी पावणे सहा वाजल्यापासून रात्री १०.४० वाजेपर्यंत डिसोझा यांना मुंबई विमानतळावरच रहावे लागले. ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीने रात्री नऊ वाजता त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपण मुंबई विमानतळावरील लाँगमध्ये बसून असल्याचे त्यांनी सांगितले. अगदी छोट्या कामासाठी आपण दिल्लीला गेलो होतो. जलद आपण गोव्याला पोहचेन, असे अपेक्षित होते. तथापि, दिल्लीचे विमान उशिरा सुटले व मुंबईचे विमान चुकल्याने आपल्याला कामावीना अकारण मुंबई विमानतळावर बसून राहावे लागले. आता रात्री १० वाजून ४० मिनिटांनी गोव्याला जाणारे विमान सुटणार आहे. तोपर्यंत मुंबई विमानतळावर बसून राहण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. दिल्लीहून विमान उशिरा सुटल्याने सारा घोळ झाला व आपला वेळ वाया गेला. (खास प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री अडकले ५ तास विमानतळावर
By admin | Published: September 09, 2014 2:10 AM