पणजी : मांद्रे मतदारसंघात मी भाजपविरुद्ध किंवा भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्याविरुद्ध पोटनिवडणुकीवेळी काम केले नाही. सोपटे यांना मत देऊ नका असे मी एकाही कार्यकत्र्याला किंवा भाजप सदस्याला कधी सांगितले नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी आपली भूमिका मांडली.पार्सेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्य़ाला दिल्लीत उपस्थित राहिले. तिथून लोकमतशी बोलताना पार्सेकर म्हणाले, की मी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही आणि भाजपसाठीच काम करत राहीन अशी भूमिका मी एकदा जाहीर केल्यानंतर मग मी पोटनिवडणुकीवेळी मांद्रेच्या राजकारणात लक्ष दिले नाही. मी कधी म्हापसा व कधी अन्यत्र भाजपचे काम केले. ज्यांना सोपटे यांचा राग होता, त्यांनी स्वत:हून सोपटे यांना मते दिली नाहीत. काही मते काँग्रेसला तर काही मते अपक्षाला गेली. मी मात्र सोपटे यांना मत देऊ नका असे एकाही व्यक्तीला सांगितले नाही. कुणीही दाखवून द्यावे.पार्सेकर म्हणाले, की एकदा भाजपने सोपटे यांना तिकीट दिल्यानंतर मी माझ्या शैक्षणिक संस्थांच्या कामातही बराच व्यस्त राहिलो. निवडणुकीच्या मतदानाच्या काळात किंवा मतमोजणी पूर्ण होईर्पयत सोपटे माझ्याविरुद्ध काहीच बोलले नाहीत. आता मात्र ते बोलतात. मी मांद्रे मतदारसंघात अगोदर आक्रमक भूमिका घेत मी पोटनिवडणूक लढवीन अशी हवा तयार केली होती. त्यावेळी जे चित्र निर्माण झाले होते ते सर्वाना ठाऊक आहे. जर मी निवडणूक लढलो असतो तर मांद्रेत कोणता निकाल लागला असता याची कल्पनाही अनेकांना आहे.
सोपटेंविरुद्ध काम केले नाही, पार्सेकरांची स्पष्ट भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:32 PM