पणजी: जर पोलीस खरोखरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करी असेल आणि कर्तव्य दक्ष असतील तर एसीबीकडून गुन्हा दखल करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतरही लाचखोर पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांच्या विरोधात गुन्हा का नोंदविण्यात आला नाही? असा प्रश्न तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी पोलिसांना केला आहे. सुदिर सुक्त प्रकरणात गुन्हा नोंद केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा सोयीस्करपणे आपल्याला हवा तसा वापरणे पोलिसांनी चालविले आहे. सुनिल गर्गविरोधात लाचखोरीचे सर्व पुरावे पोलीसांना सादर करण्यात आले आहेत. व्हिडीओ आणि आॅडिओही सादर करण्यात आला आहे. त्यात गुन्हा नोंद करण्यासाठी गर्ग पैसे मागताना दिसत आहेत आणि त्यांचा आवजही स्पष्टपणे ऐकू येत आहे. एसीबीकडून या प्रकरणात तपास करून प्राथमिक अहवालही सादर करण्यात आला आहे.
या अहवालात या प्रकरणात प्राथमिक पुरावे सापडल्याचे म्हटले आहे आणि गुन्हा नोंद करण्यात यावा अशी शिफारस एसीबीकडून करण्यात आली आहे. असे असतानाही पोलीस खाते गप्प का आणि केवळ सुदिर सुक्ताच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा निर्वाळा का देत आहेत याचे स्पष्टीकरणही पोलिसांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. गर्ग हे पोलीस अधिकारी आणि त्यातही आयपीएस असल्यामुळे त्यांना पाठिशी घातले जात आहे काय असा प्रश्न त्यांना करण्यात आला.