पणजी - राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे. ती एक प्रक्रिया आहे व त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी किंचितही अस्वस्थ होऊ नये किंवा चिंता करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
राज्यात 144 कलम लागू केल्याने सरकारवर विरोधी काँग्रेस पक्ष व इतरांनी टीका सुरू केली आहे. उत्तर गोव्यातच जमाव बंदीचा आदेश का लागू केला जात आहे अशीही विचारणा केली जात आहे. राज्याला दहशतवादापासून धोका आहे काय असे पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना येथे विचारले असता, ते म्हणाले की धोका नाही. कलम 144 लागू करणे ही प्रक्रिया राज्यात अधूनमधून सुरूच असते. सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून दोन-तीनवेळा असे कलम लागू केले जात असते. जिल्हाधिकारी व पोलीस मिळून तसा आदेश जारी करत असतात. ती प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. पर्यटकांनी तर चिंताच करू नये.
मुख्यमंत्री म्हणाले, की यापूर्वीही अनेकदा कलम 144 लागू केले गेले होते. राज्यातील सरकारी सोहळ्य़ांवर किंवा उत्सवांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आता लवकरच विविध शहरांत कार्निव्हल साजरा होणार आहे. सध्याही फिश महोत्सव व अन्य सोहळे सुरूच आहेत व त्यानिमित्ताने लोक एकत्र येत आहेत. त्यावर कुणी बंदी लागू केलेली नाही. जमाव बंदीचा आदेश लागू करण्याची जी प्रक्रिया आहे, ती राज्यासाठी नवी नाही. पर्यटकांनी निश्चिंतपणे गोव्यात यावे.