मडगाव : तामिळनाडूला आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम आता गोव्यातही होऊ लागला असून, रविवारी किनारपट्टीभागात उभारलेल्या शॉकमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडून त्यात लाखोंची हानी झाली. या वादळामुळे कोलवा बीचवर आयोजित स्विमथॉन 2017 स्पर्धाही आयोजकांना रद्द करावी लागली.गेले काही दिवस केरळ, तामिळनाडू या राज्याबरोबर लक्षद्विप बेटावर ओखी चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या वादळाचा गोव्यावरही परिणम जाणवू लागला आहे. किनारपटटीवरील शॉक्समध्ये सकाळी पाणी घुसण्याची घटना घडल्याने शॉक्समालक व तेथील कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. किनारपट्टीवर ठेवलेल्या खाटींचेही नुकसान झाले. नंतर पाणी ओसरले. या घटनेत शॉक्स मालकांची बरीच हानी झाली आहे. किनारपट्टीवरील शॉक्समध्ये पाणी घुसले आहे. काल रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमा असल्याने रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी आणखीन वाढण्याची भीती शॉक्स ओनर्स संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कादरेज यांनी व्यक्त केली.ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात सुरू असलेली जलक्रीडाही बंद ठेवण्यात आली होती. कॅप्टन ऑफ पोटर्सतसा आदेश जारी केला आहे. किनारपट्टीवर तैनात जीवरक्षकही समुद्राच्या पाण्यात कुणी उतरणार नाही, यासाठी दक्ष होते. पर्यटकांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला जात होता. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर कुटबण जेट्टीवरून काल रविवारी एकही ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात गेला नाही. ट्रॉलर जेटीवर नांगरून ठेवल्याची माहिती कुटबण ट्रॉलर्स ओनर्स संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी दिली. समुद्रात मासेमारीसाठी गेलेले काही ट्रॉलर्स अजूनही परतले नसल्याने मच्छिमा-यांमध्ये सद्या भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात मासळीचा तुटवडाही होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
ओखी चक्रीवादळाचा गोव्यातील किनारपट्टी भागात परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 7:33 PM