मडगाव: गोव्यात सगळेच लोक वास्को लॉकडाऊन करा असे मागत असतानाही तो केला जात नाही यामागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांचे स्वतःचे हितसंबंध गुंतलेले आहेत असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केला असून त्यामुळेच त्यांनी संपूर्ण गोव्यातील लोकांची आरोग्य सुरक्षा पणाला लावली आहे असा घणाघाती आरोप केला.
सध्या कोरोनाने ज्या भागात थैमान घातले आहे त्या वास्कोच्या मांगोर हिल भागात काँग्रेसने पाठविलेल्या अन्न मदत वाहिकेचे उदघाटन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, मुरगाव बंदरात जी कोळशाची जहाजे आली आहेत त्यांना कोणतीही आडकाठी येऊ नये म्हणूनच हा भाग लॉकडाऊन केला जात नाही. यात मुख्यमंत्री यांचा काय स्वार्थ आहे ते त्यांनी जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले. बंदरात आलेला कोळसा उतरवून घेतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संकेतही धुडकावून लावले गेले आहेत असा आरोप त्यांनी केला. खनिज वाहतुकीला मोकळे रान मिळावे हाही त्यामागचा हेतू असून ही वाहतूक मुख्यमंत्रीच दुसऱ्यांच्या नावाने करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले, गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या 300 पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे वास्कोत लॉकडाऊन करावा अशी मागणी मुरगावातील तिन्ही आमदार करतात. नगरपालिका आणि लोकांचीही तीच मागणी आहे पण मुख्यमंत्री ते ऐकायला तयार नाहीत. मुख्यमंत्री सावंत यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सदोष सुरक्षा किट पुरविल्यामुळे वास्को आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह एकूण 19 कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली आहे. हे सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांचीही सुरक्षा ठेऊ शकत नाही. या सर्व गोष्टींना मुख्यमंत्री सावंत हेच जबाबदार असून शून्यापासून कोरोना बाधितांची संख्या 300 वर पोहोचली आहे त्याची जवाबदारी मुख्यमंत्री सावंत यांनीच घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
कामगारांच्या बनावट यादीत जिल्हा पंचायत उमेदवारबांधकाम मजुरांच्या नावाने या सरकारने बोगस कामगारांची नोंदणी केली आहे त्यात भाजपच्या हलदोणा मतदारसंघातील उमेदवार मनीषा नाईक यांचेही नाव असून त्या या मतदारसंघातील भाजपा महिला मंडळाच्या अध्यक्ष असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. या यादीत आणखीही बोगस नावे असून काँग्रेस पक्ष त्याचा लौकरच भांडाफोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मांगोर हिल दुसरी धारावी : मिकीमांगोर हिल ही वस्ती आता दुसरी धारावी बनली असून या वस्तीत आणखीही कोरोनाबाधित मिळतील या भीतीनेच या भागातील चाचण्या घेणे बंद केल्याचा आरोप माजी आमदार मिकी पाशेको यांनी केला आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच जबाबदार असून गोव्यातील सीमावर तकलादू यंत्रणा उभी केल्यानेच कोरोना गोव्यात आत शिरला असा आरोप त्यांनी केला. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वास्को ताबडतोब लॉक करा आणि गोव्यात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या बसी, रेल्वे व विमाने बंद करा अशी मागणी त्यांनी केली