लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेली विकासकामे आणि सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आणि पत्रकार मित्र तसेच प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यासाठी येथे आलो आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
भाजपच्या येथील मुख्यालयात आयोजित पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कृषिमंत्री रवी नाईक उपस्थित होते. यावेळी तानावडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पनेची माहिती सर्वांना व्हावी यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक घटनेस ९ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान मोदी यांनी देशाचा आणि लोकांचाही विकास केला. देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा बदलली, असेही ते म्हणाले.
मोदींनी केवळ देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला विश्वास देण्याचे काम केले आहे, असे सांगून डॉ. कराड म्हणाले, केंद्रातील २०१४ पूर्वीचे सरकार एका कुटुंबाच्या इशाऱ्यावर चालत होते, अशी टीकाही केली. पहिल्यांदाच गरिबांच्या कल्याणाचे पर्व सुरू झाले आहे. सर्व सामान्यांसाठी विमा सुरक्षा, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, धूरमुक्त स्वयंपाकघर, शिक्षण, कृषी आणि आरोग्य क्षेत्रासाठी विविध योजना आणि सबसिडी देण्याचे काम भाजपाने गेल्या ९ वर्षांत केले आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले.
व्यापार, उद्योग वाढीसह विमानतळांचा विकास आणि संख्येत वाढ, सर्व राज्ये एकमेकांना जोडण्यासाठी महामार्गाचे काम, जल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यासह भाजपा सरकारने देशात रेल्वे वाहतुकीत प्रचंड सुधारणा केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीने देशातील विकासकामे गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. कराड यांनी राज्यातील संपादक, मुख्य प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.