वीज समस्येमुळे इन्व्हर्टर व्यावसायिकांची चांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 11:15 AM2019-06-12T11:15:24+5:302019-06-12T11:26:10+5:30
गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे.
पणजी - गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे.
बार्देश, सत्तरी, सांगे, डिचोली, फोंडा आणि तिसवाडी या सहा तालुक्यांमध्ये वीज पुरवठ्याविषयी जास्त तक्रारी येत आहेत. वीज मंत्रिपदाचा ताबा निलेश काब्राल या भाजपा नेत्याने काही महिन्यांपूर्वी घेतला आहे. आपल्याला फोनवरून तक्रार कळवा, आपण लगेच वीज पुरवठय़ात सुधारणा करून घेईन, असे मंत्री काब्राल यांनी जाहीर केले. वीज समस्येने हैराण होऊन अनेक लोक त्यांना संदेश पाठवतात. काब्राल यांच्याकडून काही तक्रारींची तातडीने दखलही घेतली जाते. मात्र प्रत्येकवेळी वीज पुरवठय़ात सुधारणा होते असे मुळीच नाही.
पावसाळ्यापूर्वी अनेक भागांत शट डाऊन जाहीर करून वीज खात्याच्या यंत्रणेने सुधारणा काम केले होते. जुने कंडक्टर्स बदलण्याचेही काम केले. रस्त्यांवरील वीज दिवेही बदलण्यात आले. मात्र जरा पाऊस किंवा वारा आला की, ग्रामीण गोव्यातील वीज पुरवठा खंडीत होतो. बार्देश तालुक्यातील अंजुणे पंचायत क्षेत्रातीलही लोक अशा समस्येला कंटाळले आहेत. केपे, सत्तरी, सांगे, काणकोण या चार तालुक्यांमधील बहुतेक भाग हे दुर्गम अशा ठिकाणी आहेत. बरीच लोकवस्ती जंगल परिसरात आहे. तिथे कधी झाड मोडून पडल्याने तर कधी अन्य कोणते संकट आल्याने वीजप्रवाह खंडीत होत असतो. पणजीसारख्या परिसरात ट्रान्सफॉर्मर मध्यंतरी निकामी झाले होते. तिसवाडीतील ताळगाव, करंजाळे वगैरे भागांमध्ये वीज पुरवठय़ाची समस्या वारंवार निर्माण होते. वीज खंडीत झाल्याने मग पाणी पुरवठा थांबतो. यामुळे म्हापसा, डिचोली, ताळगाव, कदंब पठार व अन्य भागांतील लोक शासकीय कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. अशावेळी जे व्यवसायिक इन्व्हर्टर विकतात त्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. घरात इन्व्हर्टर बसवला की, निदान काही पंखे व काही वीज दिवे कामी येतात म्हणून लोक इन्व्हर्टर बसवून घेऊ लागले आहेत.