लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपचा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचा तिढा कालही सुद्ध शकलेला नाही. त्यामुळे आता चार ते पाच दिवसांनंतर दुसऱ्या यादीतच तिकीट कोणाला हे स्पष्ट होईल. उत्तर गोव्यात केंद्रीय संसदीय मंडळाने श्रीपाद नाईक यांचे नाव निश्चित केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्लीहून गोव्यात परतले. दक्षिणेत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांच्याबरोबरच दिगंबर कामत यांच्या नावावरही चर्चा झाली. परंतु तिकीट कोणाला द्यावी याबाबत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र कवळेकर यांचे नाव तिकिटाच्या चर्चेबाबत आघाडीवर आहे. तर दक्षिणेत अखेरच्या क्षणी भलत्याच व्यक्तीच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
उत्तर गोव्यात उमेदवारी जाहीर झाल्यास श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवतील. या आधी सलग पाच निवडणुकांमध्ये ते निवडून आलेले आहेत व सध्या केंद्रात पर्यटन राज्यमंत्री आहेत.
दुसऱ्या यादीत नाव
दाबोळी विमानतळावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना उमेदवारांसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार दुसन्या यादीत जाहीर होईल. उत्तर गोव्याचा उमेदवार निश्चित झालेला आहे. आता जे काही आहे ते दिल्लीहूनच जाहीर होईल.
नड्डा यांनी घेतली प्रचार धोरण ठरवण्यासाठी बैठक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीत सर्व राज्यांमधील प्रदेश निवडणूक समित्यांची लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे धोरण निश्चित करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला गोव्यातून निमंत्रक दत्ता खोलकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.
कोंडी कायम...
दक्षिण गोव्यात काँग्रेसने पुन्हा सार्दिन यांना तिकीट दिल्यास आपला पाठिंबा नसेल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेससमोरही दक्षिण गोव्यात उमेदवार निवडण्याबाबत कोंडी निर्माण झाला आहे.
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक लांबणीवर
दुसरीकडे काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची कालची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक दि. ५ किंवा ६ रोजी होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षाच्या प्रदेश निवडणूक समितीने केंद्रीय समितीकडे नावे पाठवलेली आहेत. उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व विजय भिके यांची नावे आहेत, तर दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर, कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांची नावे आहेत.