पणजी : अडवलपाल- थिवी खाण ब्लॉकसाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ येत्या १५ मार्च रोजी डिचोली पर्यावरणीय जनसुनावणी घेणार आहे. खाण खात्याने आतापर्यंत जे नऊ खाण ब्लॉक ई लिलावात दिलेले आहेत तींत ३६.२२०२ हेक्टर क्षेत्र असलेल्या अडवलपाल- थिवी खाण ब्लॉकचा समावेश आहे. सुनावणीच्या दिवशी लोक आपल्या सूचना, हरकती किंवा त्यांचे काही म्हणणे असेल ते मांडू शकतील तसेच ज्या शंका आहेत त्यावर अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरणही मागू शकतील.
बाधित व्यक्तींच्या समस्या जाणून घेण्यासाठीच खनिज ब्लॉकसाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन कायदा २००६ नुसार ही जनसुनावणी होणार आहे. या खाण ब्लॉकची बोली लिलांवात मे. फोमेंतो रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जिंकली आहे. ०.३ दशलक्ष मॅट्रिक टन या ठिकाणी उत्खनन करून काढले जाणार आहे.
या अनुषंगाने लोकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून डिचोली जिमखाना, हिराबाई झांट्ये मेमोरियल हॉल येथे जन सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना त्यांचे मत मांडायचे आहे आणि बोलायचे आहे त्यांनी सुनावणीच्या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी १२ पर्यंत स्वतंत्रपणे नाव नोंदवावे. प्रकल्प प्रवर्तकाने सादर केलेल्या सारांशासह पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अहवालाच्या मसुद्याच्या हार्ड व सॉफ्ट प्रती खाण विभाग, सर्व संबंधित पंचायती आणि नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व संबंधित कार्यालयांमध्ये संदर्भासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवर सॉफ्ट कॉपी देखील उपलब्ध आहेत.