आमदारांचा व्हिडिओ मॉर्फ करून खंडणी; प्रकरण अधिक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2024 09:50 AM2024-12-11T09:50:47+5:302024-12-11T09:51:02+5:30

गोव्यातील कोणते आमदार किती पराक्रमी आहेत याची जनतेला पूर्ण कल्पना आहे.

extortion by morphing videos of goa mla | आमदारांचा व्हिडिओ मॉर्फ करून खंडणी; प्रकरण अधिक गंभीर

आमदारांचा व्हिडिओ मॉर्फ करून खंडणी; प्रकरण अधिक गंभीर

गोव्यातील कोणते आमदार किती पराक्रमी आहेत याची जनतेला पूर्ण कल्पना आहे. गोव्याबाहेरील काही विधानसभांमध्ये पूर्वी आमदारांचे विविध प्रताप उघड झालेले आहेत. म्हणजे सभागृहात बसून मोबाइलवर अश्लील क्लीप वगैरे पाहणारे आमदार काही राज्यांमध्ये होऊन गेले. काही जणांना पूर्वी कारवाईलाही सामोरे जावे लागले. गोवा विधानसभेत मात्र तसे काही घडले नव्हते. मात्र उत्तर गोव्यातील एक आमदार सेक्सटॉर्शनमध्ये सापडला आणि पूर्ण राज्यात वेगळीच चर्चा सुरू झाली. आपला व्हिडिओ मॉर्फ करून खंडणी मागितली, असे त्याचे म्हणणे आहे. खंडणी मागणाऱ्या भामट्याची पोलिस तक्रार करून आमदाराने आधीच अद्दल घडवायला हवी होती. पण तसे न करता काही पैसे प्रथम देऊन टाकले. मग पाच कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर आमदाराने पोलिस तक्रार केली. हा सगळा प्रकार गुंतागुंतीचा व काहीसा संशयास्पदही आहे.

प्रत्येकाचे एक खासगी जीवन असते. आमदार, मंत्री यांचेदेखील. सेक्सटॉर्शनचे प्रकरण अधिक गंभीर आहे. हे प्रकरण एकतर्फी आहे काय? आमदाराचा खरोखरच पैशांसाठी छळ करण्याचा प्रयत्न झाला काय, खरोखरच व्हिडिओ मॉर्फ केला गेला काय, त्याला सेक्सटॉर्शनमध्ये बेमालूमपणे गुंतविले गेले काय, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागतील. 

लोकप्रतिनिधींकडून लोकांना कायम चांगल्या वर्तनाची अपेक्षा असते. मुलांवर संस्कार करणाऱ्या शिक्षकांनी कधी दारू पिऊ नये, असे पालकांना वाटते, त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी सदाचारी व सद्‌गुणी असावा, अशी मतदारांची अपेक्षा असते. जे कायदे तयार करण्याचे काम करतात, जे समाजाला उपदेश करतात किंवा ज्यांनी गैरकारभाराबाबत सरकारला लोकांच्या वतीने जाब विचारावा असे अपेक्षित असते, त्यांचेच वर्तन जर संशयाच्या भोवऱ्यात सापडले तर लोकांना ते आवडत नाही. आदर वाढण्याऐवजी कमी होईल, असे वर्तन कुठल्याच राजकीय नेत्याने करू नये. गोव्यात एका मंत्र्यावर पूर्वी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. अर्थात त्यावेळी तो राजकारणी मंत्री नव्हता, तर आमदार होता.

८०-९० च्या दशकात गोव्यात एकाचे विनयभंग प्रकरण गाजले होते. अर्थात आताचा विषय हा तसा नाही. मात्र सेक्सटॉर्शनच्या अनुषंगाने जी स्थिती लोकांसमोर येऊ लागली आहे, ती चिंताजनक आहे. भाजपच्या एका प्रवक्त्याने नुकताच प्रश्न उपस्थित केला की- हे केवळ सेक्सटॉर्शन आहे की पूर्ण दर्जाचे सेक्स स्कैंडल आहे? संबंधित आमदार लगेच भाजप प्रवक्त्याला याबाबत उत्तर देईल, असे लोकांना वाटले होते, पण तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी, आमदाराने कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. जो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे, त्यात आमदाराचा चेहरा दिसतो. आपला तो मॉर्फ व्हिडिओ आहे, असे आमदाराने पोलिसांना कळविल्याचे सांगितले जाते.

आमदाराने मॉर्फ व्हिडिओमागे नेमके काय षडयंत्र आहे, हे समाजासमोर येऊन जाहीरपणे बोलायला नको काय? आमदारांना टार्गेट करण्यापर्यंत आरोपींची मजल जाते म्हणजे काय? की आमदाराचाच पाय घसरला? लोकांना सत्य कळायला हवे. शिवाय हेही जगासमोर यायला हवे की, तो व्हिडिओ कुणी व्हायरल केला?

सेक्सटॉर्शन प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. तो आमदाराच्या संपर्कातलाच, म्हणजे परिचयाचाच आहे. तो पोलिसांच्या ताब्यात असताना आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला जातो हेही अधिक गंभीर आहे. पोलिसांपैकीच कुणी तरी हा व्हिडिओ सरकारपर्यंत किंवा काही राजकारण्यांपर्यंत पोहोचविला नाही ना? असे विविध प्रश्न उपस्थित करण्यास वाव आहे. सेक्सटॉर्शन नव्हे तर हे सेक्स स्कॅण्डल आहे असे काही भाजपवाल्यांना वाटते. त्यांनी छोटे आंदोलनही केले. आमदाराच्या राजीनाम्याचीही मागणी केली गेली. गेले महिनाभर गाजत असलेल्या नोकरीकांडाने गोवा सरकारच्या यंत्रणांचे वस्त्रहरण झालेले आहे.

नोकरी कांडात राजकीय व्यवस्थेला क्लीन चीट देण्याचे काम पोलिसांनी केले आहे. दक्षिण गोव्याच्या एका भाजप आमदाराला कुळे पोलिसांनी क्लीन चीट दिली. नोकऱ्या विक्रीच्या एकूण प्रकरणांपासून गोमंतकीयांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठीही भाजपला आपल्या शत्रू पक्षातील आमदाराचे कथित सेक्सटॉर्शन आयते सापडले आहे.

 

Web Title: extortion by morphing videos of goa mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.