गोव्याच्या 'या' शहरात आता मिळणार नाही 'गोबी मंचुरियन'; हे आहे त्यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:03 PM2024-02-07T14:03:28+5:302024-02-07T14:04:20+5:30
गोवा अनेक कारणांमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय आहे
Goa Gobi Manchurian Ban: गोवा हे भारतातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. हे शहर अनेक कारणांमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. तुम्हाला निवांत क्षण घालवायचे असतील किंवा मनसोक्त पार्टी करायची असेल, गोवा हे प्रत्येकासाठी योग्य ठिकाण आहे. येथील खाद्यपदार्थही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. येथे अनेक प्रकारचे पदार्थ चाखता येतात. गोबी मंचुरियन हा इथला एक पदार्थ आहे, जो बऱ्याच काळापासून शाकाहारी लोकांचा आवडता पदार्थ आहे. मात्र, आता गोव्यातील एका शहरात गोबी मंचुरियनची चव चाखायला मिळणार नाही.
म्हापसा महानगरपालिकेने (MMC) गेल्या महिन्यात येथे आढळणाऱ्या गोबी मंचुरियन स्टॉल्सवर बंदी घातली. एका मीडिया रिपोर्टनुसार, ही डिश बनवण्यासाठी कृत्रिम रंग आणि अगदी वॉशिंग सोडा किंवा धोकादायक सॉसचा वापर केला जातो. MMCला याची माहिती मिळताच त्यांनी त्याच्या विक्रीवर बंदी घातली. MMC चेअरपर्सन प्रिया मिशाल यांनी एका मीडिया वेबसाइटला सांगितले की, विक्रेते अस्वच्छ परिस्थितीत काम करतात आणि गोबी मंचुरियन बनवण्यासाठी सिंथेटिक रंगांचा वापर करतात, त्यामुळे आम्हाला या डिशच्या विक्रीवर बंदी घालावी लागली.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, काही विक्रेते केवळ दिखाव्यासाठी चांगल्या दर्जाचे सॉस ठेवतात, परंतु पदार्थ तयार करताना त्यात धोकादायक सॉस वापरतात, जे आरोग्यासाठी वाईट असतात. काही वेळा शरीराला अपायकारक असलेल्या पावडरही वापरल्या जातात, ज्यामुळे जेणेकरून तळल्यानंतरही कोबी बराच वेळ कुरकुरीत राहते.