वास्को : गोव्याच्या पुढच्या पिढीला शेत जमीन राखून ठेवण्यासाठी भातशेती जमीन कोणाला विकण्यास मिळणार नसल्याचा कायदा गोवा सरकारने हल्लीच लागू केला आहे. गोव्यातील शेत जमिनीच्या सुरक्षेसाठी आम्ही तो कायदा लागू केलेला असून गोव्याच्या भविष्याच्या हीतासाठी शेतकऱ्यांनी बाहेरच्या लोकांना आपली शेत जमिन विकण्यासाठी मूळीच पावले उचलू नयेत. बेडूक पर्यावरचा समतोल राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावित असून त्यांना कोणीच मारू नये अथवा खावू नये. बेडूके मारणाºयांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जात असून भविष्यातही बेडकांच्या सुरक्षेसाठी सरकार आणखीन कडक पावले उचलणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यात विभागीय कृषी कार्यालयाची सुरवात करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. अखेरीस त्या मागणीची पूर्तता झाली असून शुक्रवारी (दि.७) कुठ्ठाळी येथील पंचायत मार्केट कोंम्प्लेक्समध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते मुरगाव तालुक्याच्या विभागीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्याबरोबर गोव्याचे कृषीमंत्री रवी नाईक, कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, कुठ्ठाळीच्या जिल्हा पंचायत सदस्या मैरसियाना वास, साकवाळच्या जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोराट, कृषी विभागाचे संचालक नेवील आल्फांन्सो आणि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुरगाव तालुक्यात पहील्यांदाच ६० वर्षानंतर विभागीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगून याचे पूर्ण श्रेय आमदार अँथनी वास आणि आमदार कृष्णा साळकर यांना जात असल्याचे ते म्हणाले. ह्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने आता मुरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येथून विविध योजना, सुविधा लाभणार असून येथील सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा उठवावा असे ते म्हणाले. मुरगाव तालुक्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना ह्या कार्यालयातून कीसान कृषी कार्ड, कीसान क्रेडीट कार्ड, हेल्थ कार्ड आणि इतर सुविधा मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी येथे येऊन त्याचा लाभ उठवावा असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कीसान क्रेडीट कार्ड वरून त्यांना शेतीसाठी ज्या वस्तू - सामग्री लागतात त्याच्या खरेदीसाठी बँकेकडून शून्य व्याज दराने कर्ज मिळणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घ्यावे लागणार नसून एका वर्षानंतर शेतकऱ्यांने बँकेकडून घेतलेली रक्कम परत करण्याची सुविधा कीसान क्रेडीट कार्डवरून उपलब्ध होणार आहे. गोवा सरकार शेतकऱ्यांना त्यांचा व्यावसाय वाढवण्यासाठी सर्वप्रकारचा पाठींबा देत असून शेतकऱ्याने लावलेले पिक बाजारात चांगल्या दरात जावे त्यांची सरकारने व्यवस्था केलेली आहे. गोव्यातील फलोत्पादन विभाग येथील शेतकऱ्याने लावलेले पिक चांगल्या दरात खरेदी करत असून १५ दिवसात खरेदीची रक्कम त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यात जमा केली जात असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गोवा सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या स्व:ताच्या पायावर उभे राहून चांगला व्यवसाय करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचललेली असून शेतकऱ्यांनी त्यांना मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ उठवावा. शेतकऱ्याने आपल्या जमनीत सदैव पिक लावण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी आपली शेत जमिन कधीच पडिक न टाकावी. कारण शेत जमीन पडीक टाकल्यास त्यात माती कचरा इत्यादी गोष्टी जमण्यास सुरू होऊन ती जमिन खराब होते. शेतकऱ्यांच्या पिक लावलेल्या जमनित जनावरे शिरून शेती खराब करूनये यासाठी शेत जमिनीच्या परिसरात ‘फेंन्सींग’ करण्याकरिता (कम्युनीटी फार्मींग) लागणाºया खर्चाची ९० टक्के रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. गोवा सरकारकडून शेतकºयांना दिल्या जाणाºया सर्व योजनांचा फायदा घेऊन अधिक कष्ट केल्यास शेतकºयांना भविष्यात मोठा फायदा होणार.
गोव्याच्या शेतकऱ्यांनी भविष्याच्या पिढीसाठी शेत जमिनी राखून ठेवण्याकरिता त्यांच्या जमिनी बाहेरच्यांना घरे इत्यादी गोष्टी बांधण्यासाठी विकू नयेत असे आवाहन सावंत यांनी केले. शेतकरी आमचा अन्नदाता असून त्यांनी त्यांच्या जमिनी न विकता तेथे सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा फायदा उठवीत शेती केल्यास त्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. गोव्यातील शेत जमिनी विकण्यात न याव्या आणि त्या पुढच्या पिढीसाठी राखून रहाव्या याकरिता हल्लीच गोवा सरकारने एक कायदा लागू केला आहे. त्या कायद्यानुसार गोव्यातील भातशेती जमिन दुसऱ्यांना विकता येणार नसल्याची माहीती सावंत यांनी दिली. बेडूक पर्यावरण - वातावरणाचा योग्यरित्या समतोल राखत असून बेडकांच्या सुरक्षेसाठी आम्ही पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे कोणीच बेडकांना मारू नये आणि खाऊपण नये असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले. बेडुक मारणाऱ्यांना पोलीस अटक करत असून भविष्यात बेडकांच्या सुरक्षेसाठी - हितासाठी सरकार आणखीन कडक पावले उचलणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. अनेकांना जो जीव दिसतो तो खावासा वाटत असून ती गोष्ट एकदम चुकीची आणि वाईट आहे. यावेळी कृषीमंत्री रवी नाईक आणि इतर मान्यवरांची भाषणे झाली.