नारायण गावस, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लहानपणापासून गोव्यात येत असल्यानेच गोव्याविषयी आकर्षण वाढले आहे. त्यातच गोव्याचा जावई असल्याने येणे-जाणे वाढले. आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा माझ्या करियरचा भाग असल्याने प्रत्येक 'इफ्फी'ला हजेरी लावत असतो. यामुळे आनंद द्विगुणित असा आनंद मिळत असतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केले.
राजधानीत सुरू असलेल्या ५५ व्या 'इफ्फी'ला त्यांनी गुरुवारी हजेरी लावली. मनोज जोशी हे ज्युरी पॅनलचेही सदस्य आहेत. जोशी म्हणाले, गोव्यात २००४ पासून इफ्फी होत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे येथे इफ्फीला येण्याची संधी मिळाली. तसे गोवा हे सर्वांचे आवडते ठिकाण आहे. असे महोत्सव त्यात आणखी भर घालतात. इफ्फी सुरू होण्याअगोदर अनेकवेळा गोव्यात आलो आहे, तसेच गोव्याचा जावई असल्याने गोव्याविषयी आकर्षण आणखी वाढले.
'इफ्फी'त जगभरातील अनेक चित्रपट दाखविले जातात. यात त्यामुळे चांगले दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळत असते. ज्युरी गटाचा भाग असल्याने इफ्फीनिमित्त चांगले चित्रपट पाहण्याची, निवडण्याची संधी मिळाली. चांगल्या दर्जाच्या कथानकाला व्यासपीठ देणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही आता नवनवीन युवा चित्रपट निर्मात्यांना संधी देत असतो, अनेक युवकांनी या क्षेत्रात येऊन चांगले कथानक देणारे चित्रपट तयार करावेत, असे सांगून जोशी म्हणाले, भारत हा असा देश आहे जिथे शेकडो वर्षांपासून चित्रपटांचा इतिहास आहे.
भारताने जगाला चांगले व दर्जेदार असे चित्रपट दिले आहेत. कारण भारतात अनेक आकर्षक असे कथानक तयार होत असते. त्यामुळे चित्रपट चांगला यश मिळते. भारतातील अनेक चित्रपट निर्मात्यांनी दर्जेदार चित्रपट तयार करुन जागतिक स्तरावर झळकले आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपट संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.