मडगाव : तीन वर्षांपूर्वी गोव्यात गूढरीत्या मरण आलेल्या फेलिक्स दहाल या स्विडीश वंशीय फिनीश युवकाच्या मृत्यूसंदर्भात आरोपीला पकडण्याइतपत जर कुणी पुरावे सादर केले तर त्याला १४०० (एक लाख रुपये) युरोचे बक्षीस जाहीर केले आहे. फेलिक्सच्या मृत्यूनंतर ‘वॉट हॅपन्स् टू फे लिक्स दहाल’ या फेसबुक पेजवर ही घोषणा करण्यात आली आहे. गोव्यात वास्तव्यासाठी आला असता पाटणे - काणकोण येथे २८ जानेवारी २०१५ रोजी या युवकाला मृत्यू आला होता.सध्या हे प्रकरण खुनाचा प्रकार म्हणून नोंद करण्यात आले असून या प्रकरणात तपास करणा-या काणकोण पोलिसांनी फेलिक्सच्या मृत्यू दरम्यान त्याच्याशी संपर्कात असलेल्या जयपूरच्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून मिळणारी माहिती या प्रकरणात महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, दहालच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीवरून जयपूरच्या त्या दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. सध्या आम्ही त्यांची चौकशी करतो. मात्र या प्रकरणात अजूनही कोणाला अटक केली नाही असे त्यांनी सांगितले. फेलिक्सची आई मीना फिरनोन हिच्या म्हणण्याप्रमाणे या खुनामागे संपत्ती विक्रीतून मिळालेल्या पैशांचे कारण आहे. फेलिक्सने जयपूरच्या त्या युवकाच्या माध्यमातून राजस्थानात एक संपत्तीचे डिलिंग केले होते. त्या विक्रीतून फेलिक्सला पैसे येणे बाकी होते. मात्र हे पैसे द्यावे लागतात यासाठीच त्याचा खून केला असावा, असा तिचा दावा आहे.फेलिक्स दहाल आॅक्टोबर २०१४ मध्ये सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात आला होता. त्यावेळी येताना सन अविस्कर या अन्य एका विदेशीशी त्याची ओळख झाली होती. सननेच नंतर त्याची गाठ जयपूरच्या झियान द जानेरो या युवकाशी करून दिली होती. फेलिक्सच्या कुटुंबीयांच्या दाव्याप्रमाणे त्या कथित प्रॉपर्टी डिलसाठी त्यानी आपल्या घरच्यांकडून पैसेही मागून घेतले होते. २८ शनिवारी २०१५ रोजी पाटणेच्या एका रेस्टॉरंटपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एका घरासमोरील रस्त्यावर पहाटे ५.३० वाजता फेलिक्स मृत्तावस्थेत सापडला होता. सुरुवातीला काणकोण पोलिसांनी हे प्रकरण अपघाती मृत्यू असल्याचे नोंद केले होते. मात्र फेलिक्सचा मृतदेह फिनलँडला नेल्यानंतर पुन्हा केलेल्या शवचिकित्सेत त्याच्या अंगावरील जखमा स्वत:हून खाली पडल्याने झालेल्या नसून कुणीतरी मुद्दाम केलेल्या आघाताने झालेल्या असावेत, असा निष्कर्ष काढला गेल्यानंतर हे प्रकरण भारतीय केंद्र सरकारकडे पोहोचले होते. केंद्र सरकारच्या सूचनेवरून एका वर्षाच्या कालावधीनंतर हे प्रकरण खून म्हणून नोंद करण्यात आले होते.
फेलिक्सच्या मारेक-यांना शोधणा-यांना एक लाखाचे इनाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 4:17 PM