महिला रुग्णावर बलात्कार करणा-या डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:10 PM2019-08-14T22:10:17+5:302019-08-14T22:17:09+5:30
गोव्यातील मायणा -कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या आंजेलो मास्कारेन्हय़स (46) याची आज बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मडगाव: एका 22 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गोव्यातील मायणा -कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या आंजेलो मास्कारेन्हय़स (46) याची आज बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. संशयित वैद्यकीय अधिकारी आहे. आज त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात उभे केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली.
सर्पदंश झाल्याने उपचारासाठी आलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी मास्कारेन्स याला अटक केली होती. भारतीय दंड संहितेंच्या 342, 354, 376 (क, ड)कलमाखाली या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. अधिक तपासासाठी त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली होती.
पीडित महिला आपल्या पतीसमवेत पाच दिवसांपूर्वी गोव्यात आली होती. कामगार वर्गातील हे कुटुंब असून ती पाच महिन्यांची गरोदर आहे. 26 जुलै रोज सर्पदंश झाल्याने तिला तपासणीसाठी कुडतरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. संशयित डॉक्टर 27 तारखेला कामावर आला असता त्याने तिची तपासणी केली. सायंकाळी तिला आपल्या खोलीत नेऊन खोलीला आतून कडी घातली नंतर तिचा विनयभंग केला होता. घरी आल्यानंतर त्या पीडितेने झालेली घटना आपल्या घरमालकिणीला सांगितली. नंतर झाला प्रकार पतीला सांगितल्यानंतर या संबंधी पोलिसात रितसर तक्रार नोंदविण्यात आली होती.