लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोलीतील आयडीसी परिसरातील एका फ्लॅटला भीषण आग लागली. यावेळी फ्लॅटमध्ये अडकलेल्या अन्नपूर्णा गौडा यांनी प्रसंगावधान राखून बाहेर धाव घेतली. त्यामुळे त्या बचावल्या. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने फ्लॅटमधील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीत लाखो रुपयांचे किमती साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. आगीत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी किंमती साहित्य जळून खाक झाले.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम वाड्याजवळील हरूण आशियाना या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये आगीची ही घटना घडली. आग लागली तेव्हा अन्नपूर्णा या फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या. त्या नेमहमीप्रमाणे फ्लॅटमध्ये झोपल्या होत्या. त्यांना आग लागल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी फ्लॅटमध्ये आगीने पेट घेतला होता. त्यांनी फ्लॅटबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना उठविले. शेजाऱ्यांनी आणि जमलेल्या नागरिकांनी धावपळ करुन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.
दरम्यान, डिचोली अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. किचनमधील गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत पाच लाखांहून अधिक रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.