पणजी - महाराष्ट्रातील एसटी संपामुळे चार दिवस गोव्याहून कदंबच्या बसगाड्या महाराष्ट्रात जाऊ शकल्या नव्हत्या. आज शनिवारपासून गोव्याहून महाराष्ट्रातील सर्व चौदा मार्गांवरून कदंबच्या 37 बसगाड्या धावल्या.
सलग चार दिवस महाराष्ट्रातील कदंबची बससेवा बंद ठेवण्याची वेळ गोवा सरकारच्या कदंब महामंडळावर प्रथमच आली. कदंबला यामुळे लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागलाच. शिवाय गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची चार दिवस मोठी गैरसोय झाली. गोव्यात बरेच प्रवासी अडकून उरले होते.
गोव्याहून सोलापुरला जाणारी नॉन स्टॉप बसगाडीही कदंबने बंद ठेवली होती. फक्त पुणे, शिर्डी आणि मुंबईला संप काळातही गोव्याहून कदंब बसगाडी धावली पण महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये एरव्ही प्रवासी वाहतूक करणाऱ्या कदंबच्या सगळ्या गाड्या चार दिवस बंद ठेवाव्या लागल्या. कदंबचे रोज सुमारे साडेचार लाखांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती कदंब महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी श्री. घाटे यांच्याकडून लोकमतला मिळाली.