चौघांच्या कुटुंबाला आता मोफत पाणी

By admin | Published: September 13, 2014 01:25 AM2014-09-13T01:25:47+5:302014-09-13T01:25:47+5:30

पणजी : राज्यातील प्रत्येक चार सदस्यीय कुटुंबास प्रतिमहिना दहा क्युबिक मीटर पाणी नळाद्वारे मोफत देण्याचा विचार सरकारने चालविला आहे.

Four families now have free water | चौघांच्या कुटुंबाला आता मोफत पाणी

चौघांच्या कुटुंबाला आता मोफत पाणी

Next

पणजी : राज्यातील प्रत्येक चार सदस्यीय कुटुंबास प्रतिमहिना दहा क्युबिक मीटर पाणी नळाद्वारे मोफत देण्याचा विचार सरकारने चालविला आहे. त्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. येत्या पंधरा दिवसांत बांधकाम खात्याकडून पाण्याची बिले आॅनलाईन पद्धतीने भरण्याची व्यवस्था ग्राहकांसाठी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री ढवळीकर म्हणाले की, नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा अनेकजण अपव्यय करत आहेत. पाणी जेवढ्या प्रमाणात हवे, तेवढ्याच प्रमाणात ते वापरायला हवे. यासाठी प्रत्येक चार सदस्यीय कुटुंबास दहा क्युबिक मीटर एवढे पाणी मोफत द्यावे, असा एक विचार पुढे आला आहे. अजून याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. केवळ चर्चा सुरू आहे. मोफत पाणी दिल्यानंतर दहा क्युबिक मीटरनंतरच्या पाण्यावरील दरात मात्र वाढ करावी लागेल.
पूर्ण देशात केवळ गोव्यातच जैका प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेबाबतची कामे उत्तम प्रकारे सुरू आहेत. त्यामुळेच जपानने जैकाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पही गोव्याला राबविण्यास मंजुरी दिली आहे, याचा अभिमान वाटतो. जपानचे तंत्रज्ञान आम्ही वापरून एका कळंगुटमध्ये १ हजार बेकायदा नळ कनेक्शन शोधून काढली आहेत. राज्यात एकूण ४७९ एमएलडी पाणी तयार होते. राज्यासाठी एरव्ही ३८० एमएलडी पाणी पुरेसे आहे. ४० टक्के पाण्याचा हिशेबच मिळत नाही. येत्या दोन वर्षांत बेहिशेबी पाण्याचे प्रमाण २० टक्क्यांवर आणले जाईल. पाणीपुरवठा विभागाच्या महसुलात आता सरासरी १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
येत्या मार्चपर्यंत पाणीपुरवठ्याबाबतचे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. राज्यातील १ हजार किलोमीटर लांबीच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी ३४५ कोटी रुपयांची योजना आम्ही केंद्र सरकारला सादर केली आहे. येत्या पाच वर्षांत पूर्ण किनारी भाग व शहरे आणि उपनगरे सांडपाणी निचरा व्यवस्थेने जोडली जातील. हे काम महागडे असल्याने ते टप्प्याटप्प्याने केले जाईल. म्हापसा, कळंगुट, मडगावमध्ये ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गोव्यासाठी सांडपाणी निचरा व्यवस्थेबाबतचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Four families now have free water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.