मडगाव : मूर्ती तोडफोडीच्या चार प्रकरणातून यापूर्वीच निर्दोष मुक्त झालेल्या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या विरुद्धच्या पाचव्या श्रीकृष्ण मंदिर तोडफोड प्रकरणातील आरोप निश्चितीपूर्वीचे युक्तिवाद पूर्ण झाले असून, यासंबंधीचा निकाल 12 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे या पाचव्या प्रकरणात तरी संशयितावर आरोप निश्चित होणार का, हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कालरुस दा सिल्वा यांच्यासमोर युक्तिवाद पूर्ण झाला. 3 जुलै रोजी रात्री संशयिताने कालकोंडा-मडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील नंदीच्या मूर्तीची तसेच तुळशी वृंदावनाची तोडफोड केल्याचा त्याच्यावर आरोप असून, या प्रकरणात सरकारी वकील तसेच संशयिताच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. संशयिताचे वकील अॅड. एरिक कुतिन्हो यांनी संशयिताने पोलीस कोठडीत दिलेल्या जबानी व्यतिरिक्त अन्य कुठलाही पुरावा पोलीस सादर करू न शकल्यामुळे याही प्रकरणात संशयिताला आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करावे, अशी मागणी केली.सदर संशयिताला कुडचडे पोलिसांनी कुडचडे सिमेंट्री क्रॉस मोडतोड प्रकरणात अटक केली होती. या अटकेनंतर आरोपीने अशा प्रकारची दीडशेपेक्षा जास्त कृत्ये आपण केल्याची कबुली दिली होती. यातील पाच प्रकरणांत त्याच्यावर आरोपपत्रही दाखल झाले होते. पण पाचपैकी चार प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीच न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे.
मूर्ती भंजनातील पाचव्या प्रकरणात तरी फ्रान्सिस्कोवर आरोप निश्चित होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 5:01 PM