मडगाव : दिडशेच्या आसपास धाद्गमक स्थळांची विटंबणा केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेला फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय हा सलग पाच प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त झाला आहे. बॉयला पकडल्यानंतर पोलिसांनी मोठा गाजावाजा करून शाबासकी मिळविली होती. मात्र एकापाठोपाठ एक प्रकरणात संशयित आरोप निश्चितीपूर्वीच न्यायालयात निर्दोष सुटला असल्याने पोलिसांच्या दाव्यातील दमच गेला आहे. आज मंगळवारी बॉय कालकोंडा - मडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती तोडफोड प्रकरणात मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष सोडले. त्याच्याविरुद्ध आरोपनिश्चित करण्यासंबंधी कुठलाही ठोस पुरावा सरकारी पक्ष सादर करू न शकल्याने याही प्रकरणातून त्याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश कालरुस दा सिल्वा यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला.चालू वर्षाच्या मे ते जुलै या दरम्यान दक्षिण गोव्यात पाठोपाठ धार्मिक स्थळांची मोडतोड झाली होती. जुलै महिन्यात पोलिसांनी दक्षिण गोव्यातील कुडचडे येथील फ्रान्सिस परेरा याला अटक केली होती. कुडचडे येथील दफनभूमीतील अंदाजे 100 क्रॉसची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली त्याला पकडले होते. व्यवसायाने टॅक्सी चालक असलेल्या फ्रन्सिसला गावात बॉय या टोपणनावाने ओळखले जात असून, पोलीस तपासात त्याने मागच्या दहा वर्षांत दिडेशाच्या आसपास धार्मिक स्थळांची आपण मोडतोड केल्याची कबुली दिली होती. मात्र आतापर्यंत फ्रान्सिस पाच प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष सुटला आहे.या चार प्रकरणात तीन प्रकरणे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या क्रॉसच्या मोडतोडीची आहे, तर चौथे प्रकरण 2009 साली वेरोडा - कुंकळळी येथील सात देउळ या प्रसिद्ध देवळांच्या मोडतोडीचे आहे. 2007 साली पर्वत - पारोडा येथे असलेल्या वालंकिणी सायबिणीच्या क्रॉस तसेच त्याच दिवशी चांदर येथील आल्मा खुरीसच्या मोडतोडच्या प्रकरणाचा यात समावेश आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश अनुराधा आंद्राद यांनी सदर संशयिताला तीन प्रकरणातून तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा सरदेसाई यांनी एका प्रकरणात त्याला यापूर्वी निर्दोष सोडले होते.
धार्मिक स्थळ विटंबणा प्रकरणात फ्रान्सिस परेरा पाचव्या प्रकरणातही निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 5:42 PM